भाजपविरोधात लढण्यासाठी काँग्रेसचा प्लान ठरला; शिर्डीत नेते-पदाधिकाऱ्यांनी घेतली शपथ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली. त्याच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्याचं समोर आलं. पक्षातंर्गत धुसफुस सुरू असतानाच काँग्रेसचं शिर्डीत नवसंकल्प शिबीर होत असून, या शिबिरात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी नाना पटोले म्हणाले, “उदयपूर नवसंकल्प शिबिरात सोनिया गांधी, राहुल गांधींनी केलेलं मार्गदर्शन आणि कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून शिर्डीत दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.”

“जेव्हा केव्हा हिमालय संकटात आला, तेव्हा सह्याद्री धाऊन गेलाय. त्यामुळे सह्याद्रीच्या भागातच काँग्रेसचं शिबीर होत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून संविधानिक व्यवस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलंय. देशाची संपत्ती दररोज विकली जातेय. देश संपवायला ते निघाले आहेत. त्यामुळे हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री खंबीर असल्याचा संदेश देण्यासाठी हे शिबीर होत आहे,” असं पटोले म्हणाले.

हे वाचलं का?

उदयपूरमध्ये झालेल्या नवसंकल्प अधिवेशनाच्या अंमलबजावणीचं हे अधिवेशन आहे. या शिबिरात जे नेते, पदाधिकारी पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहिले आहेत. त्यांना राजीनामे देण्याचं आवाहन आम्ही केलंय. जवळपास सगळ्यांनीच राजीनामे दिले आहेत. एकापेक्षा जास्त पदावर असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे राजीनामे दिले आहेत. ४०-५० लोकांनी राजीनामे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,” अशी माहिती पटोले यांनी दिली.

“कोट्यवधी लोक दरवर्षी शिर्डीत येतात. आम्ही आमचं मस्तक साईबाबांच्या चरणी ठेवून जे भाजप सरकार देशाला बर्बाद करत आहे. हा देश वाचवण्याची शपथ घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. भारत जोडोचा नारा देत काँग्रेस काम करणार आहे.

ADVERTISEMENT

“सोनिया गांधींनी दिलेल्या आदेशाची सुरूवात झाली आहे. पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात एकदिवसीय शिबीर होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात ७५ किमीची पदयात्रा काढली जाणार आहे. यातून काँग्रेसचा देशहिताचा संदेश दिला जाणार आहे.

ADVERTISEMENT

“केंद्रातील भाजप सरकारची अत्याचारी व्यवस्था, हुकुमशाही व्यवस्था, हिटलरशाही दर्शन महाराष्ट्राच्या जनतेला करून देणं, हे पुढच्या काळातील महत्त्वपूर्ण भाग असणार आहे,” अशी भूमिका पटोलेंनी मांडली.

प्रतापगढींच्या उमेदवारीवर पटोले काय म्हणाले?

प्रतापगढींच्या उमेदवारीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह दिसत आहेत. प्रतापगढींच्या उमेदवारीबद्दल पटोले म्हणाले, “लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे देशांचं नेतृत्व करतात. प्रदेशाचं करत नाही. काँग्रेसने पहिल्यांदा पायंडा पाडलाय असं नाही. भाजपनंही बाहेरचे उमेदवार दिले आहेत.”

“आमच्या मित्रपक्षांनीही बिहारचे उमेदवार दिले होते. गुजरातचा व्यक्ती उत्तर प्रदेशातून लोकसभा लढवू शकतो, तेव्हा हे प्रश्न निर्माण होतं नाही. पण गोदी मीडियाने काँग्रेसचा अपप्रचार करण्याचा काँट्रॅक्ट घेतलाय का, असा प्रश्न मला पडतो. ही देशाची निवडणूक आहे आणि आमचा उमेदवार देशातील आहे. परदेशातील आहे,” असं उत्तर पटोलेंनी दिलं.

राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील व्यक्तीलाच उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसमधील काही नेत्यांची होती. मात्र, काँग्रेसकडून पी. चिदंबरम यांच्याऐवजी इम्रान प्रतापगढींना उमेदवारी देण्यात आली. त्यावरून महाराष्ट्रासह देशातील काही काँग्रेस नेत्यांनी थेट पक्ष नेतृत्वालाच उलट सवाल केले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT