Shivsena MP संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली आहे. संजय राऊत यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे. महाराष्ट्राचं राजकारण या विषयावर आम्ही सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र सरकारच्या कामाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. शिवसेनेची जडणघडण आणि कार्यपद्धती याबद्दलही राहुल गांधी यांनी जाणून घेतलं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राहुल गांधी यांची ही भेट महत्वाची मानली जाते आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्त्वात आलं, या प्रयोगासाठी दोन नेत्यांचा मोठा वाटा होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. शरद पवारांच्या पुढाकाराने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची झालेली भेट हा चर्चेचा विषय ठरतो आहे.

एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या भाषणातून काँग्रेसवर टीका करायचे. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर सत्तेत नसलेला काँग्रेस पक्ष सत्तेत आला. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आत्तापर्यंत अनेकदा स्वबळाचा नारा दिला आहे. तसंच नाना पटोले हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीयही मानले जातात. अशात महाराष्ट्रात कशा प्रकारे कारभार सुरू आहे? महाविकास आघाडी कसं काम करतं आहे? भाजपला दूर ठेवण्यासाठी हे तीन पक्ष कसे एकत्र आले या सगळ्याबाबत या मिटिंगमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

गेल्या काही दिवसांपासून राजकीय भेटीगाठी हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली होती. एवढंच नाही तर शिवसेनेनेला सोबत घेऊन आपल्याला निवडणूक लढायची आहे असंही शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी सांगितलं होतं. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट तसंच राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची झालेली भेट या जशा चर्चेत होत्या तशीच आज संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली आहे यात शंका नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT