राज्यात रुग्णवाढीचा नवा उच्चांक, दिवसभरात ४० हजारांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण

मुंबई तक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणारा महाराष्ट्र सध्या लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. रविवारी टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आजही राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजही राज्याने रुग्णवाढीचा नवा उच्चांक गाठला असून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणारा महाराष्ट्र सध्या लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. रविवारी टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आजही राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजही राज्याने रुग्णवाढीचा नवा उच्चांक गाठला असून दिवसभरात ४० हजार ४१४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. शनिवारी राज्यातली रुग्णसंख्या ही ३५ हजार ७२६ इतकी होती.

आज १०८ रुग्णांनी कोरोनाचा सामना करताना आपले प्राण गमावले असून सध्याच्या घडीला राज्यात ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येचा वाढीचा दर हा चिंताजनक असल्याचं सांगितलं. “सध्याच्या घडीला राज्यात दर दिवशी १० टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ होते आहे. ही वाढ खरंच चिंताजनक आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहिली तर आपल्याला रुग्णालयात बेड कमी पडतील की काय अशी शंका निर्माण झाली आहे. याचसोबत जर कोरोनाचा स्ट्रेन बदलला आणि नवीन म्युटेशनचे रुग्ण सापडले तर आरोग्य यंत्रणेवर नक्कीच ताण पडू शकतो. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये आढावा घेऊन निर्बंध अधिक कडक करण्याबाबत विचार सुरु आहे. आपली वाटचाल ही लॉकडाऊनच्या दिशेने सुरु आहे. लोकांना आता गांभीर्याने वागावंच लागेल. मास्क घातले नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नाही तर लॉकडाऊन लावावंच लागेल.”

यावेळी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचंही सांगितलं. आजही अनेक लोकं आपल्यात सौम्य लक्षणं आढळली तरीही डॉक्टरांकडे जात नाहीत, घरीच थांबतात. काही वेळाने परिस्थिती गंभीर होते आणि मग ते डॉक्टरकडे जातात. त्यामुळे आपल्यात सौम्य लक्षणं दिसून आली तरी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करुन घ्या असं आवाहन राजेश टोपेंनी यावेळी बोलत असताना केलं.

उप-राजधानीला कोरोनाचा विळखा, रविवारी ५८ जणांचा मृत्यू