सातारा : डोळ्यात अंजन घालणारं वास्तव! शिक्षणासाठी मुलींचा जीवघेणा प्रवास, स्वत:च चालवतात होडी

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: भारत एकीकडे 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय पण आजही देशात काही मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात मुली जीवाची बाजी लावून दररोज कसरत करत जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी शाळेत जात आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, याच जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. ही या जिल्ह्यातील सत्य परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात खिरखंडी या गावातील मुलींना होडीने प्रवास करुन शाळेत पोहोचावं लागतं. हा त्यांचा रोजचाच दिनक्रम आहे.

कोयना धरणाचा विशाल जलाशय पार करत त्यांना छोटीशी लाकडाची होडी स्वत:च चालवत शाळेत जावं लागतं. हे या‌ मधलं सगळ्या धक्कादायक वास्तव आहे.

हे वाचलं का?

खिरखंडी हे गाव जावली तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पात येतं. या गावातील मुलींना रोज होडीतूनच प्रवास करावा लागतो. सकाळी 9 वाजता शाळा सुरु होते. यामुळे सकाळी 8 वाजता या मुलींचा घराजवळून होडीने प्रवास सुरु होतो. सुमारे अर्धा तासाचा होडीचा प्रवास करुन वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा सामना करत मुली होडी चालवत कोयनेच्या विशाल जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला घेऊन जातात.

ADVERTISEMENT

किनारी जाऊन ही होडी थांबवून पुढे त्यांना सुमारे 4 किलोमीटरची पायपीट करावी लागते. पायी प्रवास करत काट्या कुट्यातुन आणि किर्र जंगलातून मुलींना शाळेत जावं लागतं. सुमारे दीड तासानंतर अंधारी या गावतील शाळेत त्या पोहचतात. एवढ्या खडतर प्रवासानंतरत त्यांना शिक्षणाचे धडे गिरवता येतात.

ADVERTISEMENT

शाळेसाठी ज्या जंगलातून हे विद्यार्थी चालत जातात तो सगळा भाग हा घनदाट झाडी आणि व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. या जंगलात अस्वल, गवा, बिबट्या, वाघ असे अनेक हिंस्र प्राणी सुद्धा आहेत. त्यामुळे जंगलातून जात असताना हिंस्र प्राण्यांचं सुद्धा या ठिकाणी भय असतं. अशा भीतीदायक वातावरणातून जाऊन या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरु आहे.

गेली अनेक वर्ष या परिस्थितीसोबत झगडून या विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहेत. एवढंच नव्हे तर स्वत:च्या लहान भावंडांना देखील योग्य शिक्षण मिळावं यासाठी त्यांची सुद्धा काळजी घेत या मुली त्यांना सोबत घेऊन हा दररोजचा जीवघेणा प्रवास करत आहे.

राज्यात बहुतेक ठिकाणी कोरोनाच्या भीतीने पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेतच पाठवत नाहीत. मुलांच्या काळजीसाठी राज्य सरकारने काही महिने शाळा बंद केल्या. मात्र, या जावली तालुक्यातील खिरखंडीचे विद्यार्थी कोरोनापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक परिस्थितीत प्रवास करत जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्यासाठी धडपडत असल्याचं समोर आलं आहे.

या भागात पावसाळ्यात तर अतिशय मुसळधार पाऊस असतो. अशा पावसाळ्यात तर या गावातील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होतात. प्रचंड पाऊस असेल तरी सुद्धा हे विद्यार्थी होडीने प्रवास करुन काट्याकुठ्यांची वाट तुडवत शाळेत जातात.

या सगळ्या परिस्थितीकडे स्थानिक प्रशासन आणि सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कोणताही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असतात. मात्र, अशा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी चाललेली परवड गेली अनेक वर्ष थांबलेली नाही. यांचं शिक्षण सुखकर व्हावं एवढीच साधी अपेक्षा या दुर्गम खेड्यातल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षकांची आहे. या विद्यार्थ्यांची सामाजिक संस्था तसेच शासनाने लक्ष द्यावे. अशी विनंती शाळेचे शिक्षक विनायक पवार आणि गंगाराम पडघे यांनी केली आहे.

कधी पायपीट तर कधी बैलगाडीने गाठावी लागतेय शाळा, ‘या’ गावातल्या मुलांना एसटी संपाचा फटका

सातारा जिल्ह्यातील खिरखंडी या दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणासाठी चाललेली जीवघेण्या कसरतीची दखल घेऊन सरकारने त्यांच्या शाळेला जाण्या-येण्याची सोय करावी हीच अपेक्षा या विद्यार्थ्यांनी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांसाठी सरकार नेमकी काय तरतूद करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT