सात दशकांचा गौरवशाली प्रवास इतिहासजमा, कशी होती क्वीन एलिझाबेथ यांची कारकीर्द?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथ यांचं निधन झालं आहे. गुरूवारी रात्री ११ च्या सुमारास बकिंगहॅम पॅलेसने यासंदर्भातली घोषणा केली आहे. सात दशकांची म्हणजेच सत्तर वर्षांची प्रदीर्घ अशी कारकीर्द क्वीन एलिझाबेथ यांची आहे. क्वीन एलिझाबेथ यांनी १९५२ मध्ये महाराणी म्हणून पदभार स्वीकारला. तह हयात त्या महाराणी होत्या. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आणि आपलं महाराणी पद हे जनतेच्या नावेच केलं होतं. महाराणी म्हणून प्रत्येक जबाबदारी त्यांनी लीलया पेलली.

ADVERTISEMENT

महाराणी एलिझाबेथ यांची ७० वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द

महाराणी एलिझाबेथ यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत फक्त इंग्लंड नाही संपूर्ण जगभरात अनेक प्रकारची उलथापालथ झाली. कधी त्यांच्यासमोर आर्थिक संकट होतं तर कधी राजकीय संकट उभं राहिलं. मात्र या सगळ्या उलथापालथींना सगळ्या परिस्थितीला समर्थपणे तोंड देत त्यांनी जनतेचा विश्वास जिंकून घेतला. त्यामुळेच महाराणी एलिझाबेथ यांच्याबाबत ब्रिटनच्या जनतेच्या मनात आदर होता. तो आदर कैक पिढ्या टिकून राहिल

वडिलांच्या मृत्यूनंतर आलं महाराणी पद

एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे जेव्हा महाराणी पद आलं तेव्हा ब्रिटनची अवस्था जगात फारशी चांगली नव्हती. समाजात क्रांतीकारी बद होत होते. ब्रिटनमध्ये बरेचसे लोक राजघराण्यावर प्रश्न उपस्थित करू लागले होते. मात्र या सगळ्या आव्हानांचा महाराणी एलिझाबेथ यांनी समर्थपणे सामना केला. त्यांनी ब्रिटनची जनता आपल्यावर आणि आपल्या शाही घराण्यावर विश्वास कसा ठेवेल याच दृष्टीने आपली कारकीर्द पार पाडली.

हे वाचलं का?

एलिझाबेथ या महाराणी होतील कुणाला वाटलंही नसेल

२१ एप्रिल १९२६ ला एलिझाबेथ यांचा जन्म बर्कले मध्ये झाला होता. एलिझाबेथ या त्यावेळी ब्रिटनचे राजे असलेले जॉर्ज पंचम यांचे द्वितीय पुत्र ड्युक ऑफ यॉर्क, अल्बर्ट यांची मोठी मुलगी होत्या. एलिझाबेथ या कधीही शाळेत गेल्या नाहीत. त्यांची लहान बहीण मार्गारेट यांचं शिक्षण मात्र राजमहालात झालं. एलिझाबेथ या त्यांच्या वडिलांच्या आणि आजोबांच्या लाडक्या होत्या. सहा वर्षाच्या वयात असतानाच त्यांनी घोडेस्वारी शिकू लागल्या होत्या.

ADVERTISEMENT

एलिझाबेथ यांचं लहानपण नेमकं कसं होतं?

एलिझाबेथ या लहानपणापासून जबाबदारीनं वागणाऱ्या होत्या. ब्रिटनचे माजी दिवंगत पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांच्यावरही एलिझाबेथ यांचा प्रभाव पडला होता. एवढ्या छोट्या वयात जे एलिझाबेथ बोलतात त्यात एकप्रकारचं धोरण आहे असं ते म्हणत. कधीही शाळेत न गेलेल्या एलिझाबेथ यांनी अनेक भाषांचा मात्र बारकाईने अभ्यास केला. त्या विविध भाषा शिकल्या. तसंच ब्रिटनचा इतिहासही त्यांनी वाचला.

ADVERTISEMENT

१९३६ मध्ये ब्रिटनचे किंग जॉर्ज पंचम यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांचा मोठा मुलगा डेविड, एडवर्ड अष्टम हे गादीवर बसले. मात्र एडवर्ड यांनी एका अमेरिकी महिलेसोबत विवाह केला. सिंपसन असं तिचं नाव होतं. तिचा दोनदा घटस्फोट झाला होता. तसंच सिंपसन यांचं जे धार्मिक धोरण होतं त्यालाही ब्रिटनमध्ये विरोध होत होता. त्यामुळेच एडवर्ड अष्टम यांना राजेपद सोडावं लागलं.

यानंतर एलिझाबेथ यांचे वडील ड्युक ऑफ यॉर्क किंग जॉर्ज षष्ठम या नावे गादीवर बसले. एलिझाबेथच्या वडिलांना राजेपद नको होतं. मात्र अशा पद्धतीने ते त्यांना मिळालं. वडील राजे झाल्यानंतर एलिझाबेथ यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक प्रकर्षाने झाली. तो काळ असा होता जेव्हा हिटलची ताकद वाढत होती. युरोपात अनेक ताण-तणाव सुरू झाले होते. या सगळ्यात किंग जॉर्ज षष्ठम हे आपल्या कुटुंबासह देशाच्या दौऱ्यावर गेले. या दरम्यान एलिझाबेथ यांनी आपल्या वडिलांकडून अनेक गोष्टी शिकल्या.

१९३९ मध्ये जेव्हा एलिझाबेथ १३ वर्षांच्या होत्या तेव्हा त्या आपल्या वडिलांसोबत आणि आईसोबत डार्टमथ येथील रॉयल नेव्हल कॉलेमध्ये जाऊ लागल्या. तिथे त्यांची भेट ग्रीसचे प्रिन्स फिलिप यांच्यासोबत झाली. ही त्यांची पहिली भेट नव्हती. मात्र जेव्हा नेव्हल कॉलेजमध्ये हे दोघं भेटले तेव्हा एलिझाबेथ यांना प्रिन्स फिलिप आवडू लागले. सुट्टी असताना प्रिन्स फिलिपही आपल्या राजघराण्यातील नातेवाईकांना भेटण्यासाठी लंडनमध्ये पोहचले. १९४४ वर्ष संपत असताना एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांच्या प्रेमकहाणीने आकार घेतला होता. ते दोघेही एकमेकांना चिठ्ठी पाठवत असत. एलिझाबेथ या त्यांच्या खोलीत प्रिन्स फिलिप यांचे फोटोही ठेवू लागल्या होत्या.

दुसरं महायुद्ध संपल्यावर काय घडलं?

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर प्रिन्सेस एलिझाबेथ या अॅग्जिलरी टेरिटोरियल सर्व्हिसमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांनी कार चालवणं आणि ती दुरूस्त करणं शिकून घेतलं होतं. ८ मे १९४५ या दिवशी राजकुमारी एलिझाबेथ यांनी शाही कुटुंबासह दुसरं महायुद्ध संपल्याची मेजवानी साजरी केली. कारण या महायुद्धात ब्रिटनचा विजय झाला होता.

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर एलिझाबेथ या प्रिन्स फिलिप यांच्याशी विवाह करू इच्छित होत्या. मात्र त्यांच्या मार्गात काही अडथळे होते. एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज हे आपल्या मुलीला दूर करू इच्छित नव्हते. तर प्रिन्स फिलीप हे दुसऱ्या देशाचे होते हे देखील लग्नाला आक्षेप घेण्याचं कारण होतं. मात्र या सगळ्या अडचणी दूर झाल्या. २० नोव्हेंबर १९४७ ला लंडनच्या शाही चर्चमध्ये हे दोघं विवाहबद्ध झाले.

शाही परिवारातल्या एलिझाबेथ यांच्याशी लग्न केल्यानंतर प्रिन्स फिलिप यांना ड्युक ऑफ एजिनबरा हे पद मिळालं. मात्र त्यांनी शाही नौदलातली नोकरी सोडली नाही. लग्नानंतर काही काळ त्यांनी माल्टा या ठिकाणी व्यतित केला. त्यावेळी ते अगदी सामान्य जोडप्याप्रमाणे राहात होते.

प्रिन्स फिलिप आणि राजकुमारी एलिझाबेथ यांचा पहिला मुलगा म्हणजेच प्रिन्स चार्ल्स यांचा जन्म १९४८ मध्ये झाला. तर त्यानंतर दोन वर्षांनी एलिझाबेथ यांना एन ही मुलगी झाली. याच दरम्यान एलिझाबेथ यांच्या वडिलांची म्हणजेच किंग जॉर्ज यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग जडला होता.

जानेवारी १९५२ मध्ये एलिझाबेथ आणि त्यांचे पती विदेशात गेले. त्यावेळी विमानतळावर निरोप द्यायला एलिझाबेथ यांचे वडील आले होते. ही या वडील आणि मुलीमधली शेवटची भेट ठरली. एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप केनियामध्ये होते तेव्हाच एलिझाबेथ यांना वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्यानंतर त्या ब्रिटनला आल्या आणि मग त्यांनाच महाराणी म्हणून जाहीर करण्यात आलं. वडिलांच्या गादीवर एलिझाबेथ बसल्या आणि क्वीन एलिझाबेथ झाल्या.

एलिझाबेथ यांनी महाराणी झाल्यावर काय म्हटलं होतं?

एलिझाबेथ यांना जेव्हा ब्रिटनच्या महाराणी म्हणून घोषित करण्यात आलं तेव्हा त्या क्षणांची आठवण करताना एलिझाबेथ यांनी लिहिलं होतं की माझ्या वडिलांचा मृत्यू खूप लवकर झाला. मला त्यांच्यासोबत राहून शाही कामकाज कसं चालतं ते शिकण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अचानक आलेली ही जबाबदारी योग्य पद्धतीने निभावण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं.

जून १९५३ मध्ये एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक सोहळा सगळ्या जगातल्या प्रसारमाध्यमांनी लाईव्ह दाखवला. हा पहिला असा कार्यक्रम होता जो अनेक लोकांनी पहिल्यांदा लाईव्ह पाहिला होता. त्यावेळी पंतप्रधान पदी असलेल्या विंस्टन चर्चिल यांना हा कार्यक्रम म्हणजे वायफळ खर्च वाटला होता. कारण तो काळ दुसऱ्या महायुद्धानंतरच्या आर्थिक मंदीचा काळ होता. कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण करायला चर्चिल यांनी विरोध दर्शवला होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनचा गौरव परत आणण्याचं सर्वात मोठं आव्हान एलिझाबेथ यांच्यासमोर होतं. त्यावेळी एलिझाबेथ या पहिल्या महाराणी होत्या ज्यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या देशांचा दौरा केला होता. त्यावेळी एलिझाबेथ यांना दोन तृतीयांश ऑस्ट्रेलियन नागरिकांनी जवळून पाहिलं अशी चर्चा झाली होती.

१९५६ ला सुएझ कालवा प्रकरण घडलं त्यामुळे ब्रिटिश राज्यांचा अंमल कमी झाल्याचं चित्र गडद झालं. या परिस्थितीतूनही एलिझाबेथ यांनी मार्ग काढण्याचं ठरवलं. कॉमनवेल्थ राष्ट्रं एकजुट होऊन एकत्र येत नाहीत हे त्यांनी पाहिलं. इजिप्तने बंड केलं होतं. ते मोडून काढण्यासाठी इंग्लंडच्या फौजाही पाठवण्यात आल्या. मात्र या फौजांना माघार घ्यावी लागली. ही नामुष्की ओढवल्यानंतर पंतप्रधान अँथनी एडन यांना राजीनामा द्यावा लागला होता. ही घटना एलिझाबेथ यांना राजकीय पेचात पाडणारी ठरली.

महाराणी एलिझाबेथ या लिहून दिल्याशिवाय भाषणच करू शकत नाहीत. एलिझाबेथ यांचा राज्यकारभार चालवणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता उच्चवर्णीय आहे या प्रकारचे आरोप झाले. मात्र या सगळ्याला त्यांनी योग्य रितीने उत्तर दिलं.

राजदरबारात सुरू असलेल्या अनेक जुन्या रिती आणि रिवाज महाराणी एलिझाबेथ यांनी बदलल्या किंवा बंद केल्या. राजेशाही हा शब्द त्यांनी सोडला त्याऐवजी राजघराणं हा शब्द वापरण्यास सुरूवात केली.

एकंदरीतच त्यांची संपूर्ण कारकीर्द ही भट्टीतून ज्याप्रमाणे सोनं तावून सुलाखून निघतं तशीच राहिली. त्यांच्या मृत्यूनंतर एक पर्व संपल्याची चर्चा आता जगभरात होते आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT