मुख्याध्यापकापासून ते शिपायापर्यंत… सावित्रीच्या लेकी सांभाळत आहेत शाळेची धुरा
–जका खान, बुलडाणा महिला दिनानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व आणि नेतृत्व करणाऱ्या महिलांच्या संघर्ष कहाण्या समोर येताहेत. स्वतःला सिद्ध करणाऱ्या महिला आज वेगवेगळ्या ठिकाणी आत्मविश्वासाने वावरताना दिसत आहे. बुलडाणा शहरातही एका शाळेचं काम साऱ्या जणी मिळून करत आहेत. शाळेतील शिपाईपदापासून ते मुख्याध्यापक पदापर्यंत सर्व महिलाच असून, या सावित्रीच्या लेकी यशस्वीपणे त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. बुलडाणा शहरातील […]
ADVERTISEMENT

–जका खान, बुलडाणा
महिला दिनानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व आणि नेतृत्व करणाऱ्या महिलांच्या संघर्ष कहाण्या समोर येताहेत. स्वतःला सिद्ध करणाऱ्या महिला आज वेगवेगळ्या ठिकाणी आत्मविश्वासाने वावरताना दिसत आहे. बुलडाणा शहरातही एका शाळेचं काम साऱ्या जणी मिळून करत आहेत. शाळेतील शिपाईपदापासून ते मुख्याध्यापक पदापर्यंत सर्व महिलाच असून, या सावित्रीच्या लेकी यशस्वीपणे त्यांचं कर्तव्य बजावत आहेत.
बुलडाणा शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे, या उद्देशाने अतिशय कमी शुल्कामध्ये १९७२ साली शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाल शिवाजी इंग्लिश कॉन्व्हेंटला सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याचं काम सुरू आहे.
गत काही वर्षांपासून या शाळेत मुख्याध्यापक, शिक्षिका ते शिपाई या सर्व पदांची जबाबदारी ही महिलांवर सोपविण्यात आलेली आहे. शाळेत कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचारी दिलेली जबाबदारी अतिशय सक्षम पणे बजावत आहेत. या शाळेमध्ये मुख्याध्यापकापासून ते शिपाई अशा एकूण २२ कर्मचारी महिला कार्यरत आहेत.
बुलडाणा जिल्ह्याला ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असा सर्वच बाबतीत वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबर राजमाता जिजाऊ आणि ताराबाई शिंदे यांच्या नावाने प्रामुख्याने हा जिल्हा ओळखला जातो. ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले त्याच पद्धतीने सर्व शिक्षिका विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न करतात.
महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे सर्वच शासकीय, निमशासकीय सर्वच कार्यालयांमध्ये महिलांची ५० टक्के संख्या पाहायला मिळते. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे, जिथे पूर्णपणे महिला कार्यरत आहेत. या शाळेचा आपण एक भाग असल्याचा अभिमानही येथील महिला शिक्षिकांना वाटतोय आणि त्यांच्यासोबत काम करत असल्याचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील आनंद आहे.