'भाजपनेच शिवसेना फोडली'; सुशील कुमार मोदींचं मोठं विधान, नितीश कुमारांना गर्भित इशारा

Nitish Kumar jdu-bjp alliance breaks : भाजपसोबतची आघाडी तोडल्यानंतर भाजप नेत्यांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल
bihar political crisis : sushil kumar modi on shiv sena split and nitish kumar
bihar political crisis : sushil kumar modi on shiv sena split and nitish kumar

महाराष्ट्रातील शिवसेनेत पडलेल्या फुटीचा दाखला देत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी जदयूचे नेते नितीश कुमार यांना गर्भित इशारा दिला आहे. ज्यांनी आम्हाला धोका दिला, त्यांना परिणाम भोगावे लागले आहेत, असं विधान मोदी यांनी केलं. त्यामुळे शिवसेनेतील फुटीमागे भाजपचा हात असल्याच्या चर्चेनं डोकं वर काढलंय.

गेल्या काही महिन्यांपासून जदयू-भाजपतील सुप्त संघर्षाचा मंगळवारी शेवट झाला. बिहारमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाने सत्ता समीकरणं बदलली. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतचे संबंध तोडत एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली. नितीश कुमारांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा हादरा बसला आहे.

नितीश कुमारांनी भाजपपासून वेगळं होतं, लालू प्रसाद यादव यांच्या राजदसह (राष्ट्रीय जनता दल) काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या महाआघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजपच्या हातून एक राज्य गेलं असून, पक्षातील नेत्यांनी नितीश कुमारांविरोधात टीकेचा भडीमार केला आहे.

शिवसेनेबद्दल सुशील कुमार मोदी काय म्हणाले?

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले भाजपचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमारांना थेट शिवसेनेचं उदाहरण देत गर्भित इशारा दिला. एनआयए वृत्तसंस्थेशी बोलताना सुशील कुमार मोदींनी मोठं विधान केलं आहे.

"त्यांना (नितीश कुमार) जो मानसन्मान भाजपने दिला, तो राष्ट्रीय जनता दलासोबत जाऊन मिळणार नाही. आमच्याकडे जास्त आमदार असतानाही आम्ही त्यांना (नितीश कुमार) मुख्यमंत्री बनवलं. कधीही त्यांची पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही फक्त त्यांनाच तोडलंय ज्यांनी आम्हाला धोका दिला. महाराष्ट्रात शिवसेनेनं आम्हाला धोका दिला आणि त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले", असं म्हणत सुशील कुमार मोदींनी नितीश कुमार यांना इशारा दिला आहे.

सुशील कुमार मोदींनी नितीश कुमारांना दिलं आव्हान

सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांनी राजदसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक ट्विटही केलं आहे. "भाजपने नितीश कुमार यांच्या सहमतीशिवाय आरसीपी सिंह यांना मंत्री केलं, हे पूर्णपणे खोटं आहे. भाजप जदयूला तोडण्याचे प्रयत्न करत असल्याचंही खोटं आहे. ते (नितीश कुमार) आघाडी तोडण्याचं कारण शोधत होते. भाजप २०२४ मध्ये प्रचंड बहुमताने सत्तेत येईल", असं सुशील कुमार मोदी यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेतील फुटीमागे भाजपचा हात?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आधी भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये, तर नंतर आसाममध्ये मुक्काम ठोकला होता. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये होते. त्यांच्यासोबत भाजपचे नेते होते. त्यामुळे या सगळ्यांमागे भाजप असल्याचं बोललं गेलं. शिवसेनेकडूनही तसे आरोप झाले.

शिवसेनेतील बंडखोरीमागे भाजप असल्याच्या चर्चा राज्यातील नेत्यांनी मात्र फेटाळून लावल्या होत्या. हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न असल्याचंही भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सांगितलं. यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील याचीही अशीच भूमिका होती. मात्र, सुशील कुमार मोदींच्या विधानानं आता खळबळ उडाली आहे.

"भाजपने कधीही जदयूला तोडण्याचे प्रयत्न केले नाहीत. ज्यांनी भाजपला दगा दिला त्यांनाच भाजपने तोडलं", असं सुशील कुमार म्हणाले. त्यानंतर लगेच पुढचं वाक्य ते बोलले. ते म्हणाले की, "महाष्ट्रात शिवसेनेनं भाजपला धोका दिला आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले." सुशील कुमारांच्या याच विधानामुळे आता शिवसेनेतील फुटीमागे भाजपचा होता, हा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.

रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमारांवर डागली तोफ

माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. "तुम्ही (नितीश कुमार) आमच्यासोबत कसे आणि का आले होता, याची आठवण करून देऊ इच्छितो. नितीश कुमारजी, तुम्हाला बिहारचे मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याला तुमच्याच पक्षातील लोकांचा विरोध होता. आम्ही आग्रह केला. २०१३ मध्ये नरेंद्र मोदींमुळे तुम्ही एनडीएतून बाहेर गेला होतात. २०१४ मध्ये पराभूत झालात. त्यानंतर लालू प्रसादासोबत गेला होतात. त्यानंतर २०१५ मध्ये लालूप्रसाद यादवांसोबत जाण्याचा पुनर्विचार का केला नाही", असा प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमारांना केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in