देशात आजच्या घडीला आणीबाणीसारखी स्थिती आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आणीबाणीच्या काळात जे घडत होतं तसंच आज घडतं आहे. मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली तर थेट देशद्रोही ठरवलं जातं हे धोरण योग्य नाही. त्यावेळी आणीबाणी घोषित करण्यात आली होती सध्या छुप्या पद्धतीने आणीबाणी लावण्यात आली आहे. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेतकरी आंदोलनात शेतकऱ्याची संख्या कमी झाली असेल पण राकेश टिकैत हे आंदोलनात टिकून आहेत ते महापंचायती घेत आहेत. त्यांना मिळणारा पाठिंबा साधा नाही ही बाबही लक्षात घेतली पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनात वेळकाढूपणा करुन सरकार आंदोलन संपवण्याचा विचार करत असेल तर लोक त्यांना निवडणुकीत उत्तर देतील असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पेट्रोल डिझेल दरवाढीवरूनही टीका
पेट्रोल डिझेल आणि दरवाढीच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली. इंधन दरवाढीचा फटका हा भाजपच्या नेत्यांना का बसत नाही? पेट्रोल आता शंभरी गाठण्याच्या तयारीत आहे. असं असलं तरीही भाजप नेत्यांना या गोष्टीचा फटका बसत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कोरोनावरूनही भाजपवर टीका
मुंबई, विदर्भातल्या काही शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत याबाबत विचारलं असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही निर्णय दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतले होते. तेव्हा भाजपच्या नेत्यांनी मंदिरंच का बंद ठेवली आहेत? हेच बंद आहे तेच का बंद आहे? असे प्रश्न विचारले आणि आंदोलनंही केली. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याची जबाबदारी भाजपचे नेते घेतील का त्यासाठी पुढे येतील का? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.