
Tokyo Olympics मध्ये मीराबाई चानूननंतर बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूने ब्राँझ मेडल जिंकलं आहे. सिंधूच्या या कामगिरीनंतर तिचे वडील पी. व्ही. रामणा यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सिंधूचे प्रशिक्षक पार्क यांचे रामाणा यांनी विशेष आभार मानले आहेत. लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे याचंही मला समाधान आहे असंही रामाणा म्हणाले.
'तिचा पराभव झाला, त्यानंतरही माझं मी तिच्याशी बोलणं झालं. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होतो. माझ्यासाठी विजय मिळव असं मी सिंधूला सांगितलं. तिने आज आक्रमक खेळ केला. 3 तारखेला सिंधू दिल्लीला येणार आहे. तेव्हा मी तिला दिल्लीला घ्यायला जाणार आहे. सिंधूला आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. पुढच्या ऑलिम्पिकमध्येही ती खेळेल असा मला विश्वास आहे. खेळावर ती लक्ष केंद्रीत करते. हा खेळ ती एंजॉय करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतुक केलं आहे आणि तिला म्हणाले आहेत की टोकियोहून परत आलीस की आपण सोबत आईसक्रिम खाऊ. त्यामुळे सिंधू जेव्हा परत येईल तेव्हा ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आईसक्रिम खाणार आहे ' असंही तिच्या वडिलांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूचं अभिनंदन केलं आहे. सिंधूने आज जो खेळ केला आणि जी पदकाची कमाई केली त्यामुळे भारताची मान उंचावली आहे. या आशयाचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंधूचं अभिनंदन केलं आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही पी. व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. सिंधू तू इतिहास घडवलास असं म्हणत ट्विट करून त्यांनी सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सिंधूचं कौतुक केलं आहे. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे असं म्हणत कोविंद यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
पहिल्या सेटमध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात केली. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये सिंधूकडे ४-० अशी आघाडी होती. परंतू चीनच्या हे बिंग जिआओ ने चांगली झुंज देत सिंधूला बरोबरीत रोखलं. ४-० अशा आघाडीवर असलेल्या सिंधूशी बरोबरी करत हे बिंगने पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली. चिनी खेळाडूंच्या रणनितीसमोर सिंधू पुन्हा एकदा कमी पडते की काय असं वाटत असतानाच सिंधूने वेळेत स्वतः सावरलं.
आपल्या ठेवणीतले काही फटके वापरत सिंधूने मध्यांतरापर्यंत पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. ११-८ अशा आघाडीनंतर पहिला सेट सुरु झाला. ज्यानंतर सिंधूने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. युवा चिनी खेळाडूला तिने कोर्टच्या दोन्ही बाजूला पळवत सुरेख वसूल केले. हे बिंगने सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा...परंतू सामन्यावर पकड मजबूत केलेल्या सिंधूने नंतर हे बिंगला पुनरागमन करण्याची संधीच न देता २१-१३ च्या फरकाने पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात करत सेटमध्ये आघाडी घेतली. आपल्या अनुभवाचा फायदा घेत सिंधूने हे बिंगला चुका करायला भाग पाडत एका क्षणाला ५-२ अशी आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरादाखल हे बिंगनेही काही सुरेख फटके खेळले. सिंधूला अडचणीत आणत हे बिंगने काही सुरेख स्मॅशचे फटके खेळत आपले इरादे स्पष्ट केले. दुसऱ्या सेटमध्ये हे बिंग सिंधूला मोठी आघाडी घेऊ देत नव्हती. सिंधूने क्रॉस कोर्ट स्मॅशचा सढळ हस्ते वापर करत हे बिंगवर दडपण आणायला सुरुवात केली. सिंधूच्या या आक्रमक खेळाचं उत्तर हे बिंग जिआओच्या खेळात नव्हतं. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये काही सुंदर रॅली झाल्या, ज्याचा फायदा घेत हे बिंगने सिंधूला पुन्हा एकदा आव्हान देण्यास सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंमध्ये सिंधूचा अनुभव हा उजवा असला तरीही हे बिंगही तिला सहज आघाडी घेऊ देत नव्हती. अखेरीस आपला अनुभव पणाला लावत सिंधूने दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ११-८ अशी आघाडी घेतली. बिंगने सिंधूला कडवी झुंज देत मोठी आघाडी घेऊ दिली नाही. अखेरीस सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत २१-१५ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत कांस्यपदकावर नाव कोरलं.