अखेर ती आलीच! ग्लोबल टीचर ट्रॉफीचं डिसले गुरुजींकडून स्वागत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जागतिक पातळीवरील वर्ष 2020चा ‘ग्लोबल टिचर अॅवॉर्ड’ पटकावल्यानंतर, सोलापूरच्या रणजित सिंह डिसले गुरुजींवर सर्व बाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाला. देशभरातून आणि परदेशातूनही त्यांच्या कामगिरीचं दिग्गजांनी कौतुक केलं. पंतप्रधान कार्यालयानेही डिसले गुरुजींचं अभिनंदन केलं. कोव्हिडच्या महामारीमुळे डिसले गुरुजींना ग्लोबल टिचर्स अवॉर्ड सोहळ्यालाही हजेरी लावता आली नाही. त्यामुळे, आता डिसले गुरुजींनी मिळवलेली ट्रॉफी त्यांना घरपोच आली आहे.

डिसले गुरुजींनी याचा फोटो शेअर करत, हीच ती जीची मी वाट पाहत होतो, असे कॅप्शन दिलं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केली आहेत. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केलं आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची प्रयोगशाळा उभारली आहे. आपल्या याच कल्पकता आणि संशोधनात्मक वृत्तीच्या जोरावर त्यांनी ग्लोबल टिचर अवॉर्ड मिळवला आहे. कोरोनामुळे त्यांना हा पुरस्कार सोहळा ऑनलाईनच पाहावा लागला. मात्र त्यानंतर ग्लोबल टिचर अवॉर्डची ट्रॉफी आता त्यांना घरपोच मिळाली आहे. डिसले गुरुंजींना आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्रॉफीसोबतच फोटो शेअर करत आनंद व्यक्त केलाय.

रणजितसिंह डिसले यांनी लॉकडाऊनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले. या स्कॉलरशिपसंदर्भात रणजितसिंह डिसले यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील दहा कोटीहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशातील शाळांमध्ये विज्ञान विषयाचं शिक्षण घेत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ‘कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप’ या नावाने 400 युरोची ही स्कॉलरशिप इटलीतील सॅमनिटे राज्यातील दहा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार आहेत. विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाणार असून याकरिता संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. पुढील दहा वर्षे 100 मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी मिळालेल्या पुरस्कार रकमेतील म्हणजेच 7 कोटींपैकी अर्धी रक्कम म्हणजेच साडे तीन कोटींची रक्कम 9 देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकीच एक आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT