अमरावती: कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमरावतीमध्ये सोमवारी (22 फेब्रुवारी) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाउन लावलं आहे. अनलॉकनंतर संपूर्ण राज्यात लॉकडाउन लागलेला हा एकमेव जिल्हा आहे. अमरावतीमध्ये लॉकडाउन लावण्यासाठी कारण ठरलं ते इथे वेगाने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या. अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या इतक्या वेगाने का वाढतेय हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. ‘मुंबई तक’ने देखील याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय याची कारणं जाणून घेण्यासाठी मुंबई तकने अमरावतीचे आयुक्त पियुष सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी मृत्यूदरात वाढ झालेली दिसत नाही नाही. उलट गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात मृत्यूदर कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली तर अमरावतीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 50 टक्क्यांनी वाढला आहे. पण मृत्यूदर जानेवारी महिन्यात 0.86 टक्के होता तो गेल्या 21 दिवसात 0.57 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील रुग्णांची संख्या वाढलेली दिसतेय. रुग्ण वाढीचं नेमकं कारण काय याबद्दल सध्या तरी काही माहिती नाही. असं आयुक्तांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं. सगळीकडे रुग्णवाढीची जी कारणं दिसताहेत तीच कारणं इथेही सांगता येतील असं आयुक्तांचं म्हणणं आहे. ज्यानुसार लोकांनी मास्क न वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे आणि सेशल डिस्टन्सिंग न पाळणं वगैरे कारणामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशी माहिती आयुक्त पियुष सिंग यांनी दिली.
दुसरीकडे आयुक्त पियुष सिंग यांचं म्हणणं आहे की, रुग्णांची वाढती संख्या आणि वेग लक्षात घेऊन अमरावतीतील काही रुग्णांचे सॅम्पल्स हे अमरावती प्रयोगशाळेतून एनआयव्हीला तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचे रिपोर्ट आले की स्ट्रेन बदलला आहे काय़ हे कळेल. सध्या अमरावतीमधील ५ सॅम्पल्स आणि यवतमाळमधील ५ सॅम्पल्स एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार या वाढत्या रुग्णसंख्येत एकच बाब लक्षात आलीय ती म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोना झाला की इतर व्यक्तींची चाचणी केली असता त्यांचेही सॅम्प्ल्स पॉझिटिव्ह येऊ लागले आहे. हे पूर्वी कधी फारसं पाहायला मिळालं नव्हतं. असं अमरावतीचे आयुक्त म्हणाले.
ही बातमी देखील पाहा: महाराष्ट्रातील ‘या’ पाच जिल्ह्यात कोरोना पसरतोय हातपाय!
गेल्या काही दिवसात वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये फ्लूचे रुग्ण आढळत होते. या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यातले बरेच सॅम्पल कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह येऊ लागले. नियमानुसार एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या टेस्टिंग करायला अमरावतीमध्ये सुरुवात केली तेव्हा, कुटुंबातील इतर व्यक्ती पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात हे लक्षात येऊ लागल्यानंतर संपर्कात आलेल्या रुग्णांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं आढळलं. कोरोना रुग्णांची संख्या शहरामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे. हे रुग्ण जानेवारी आणि डिसेंबर महिन्यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत पाच पटीने अधिक होते. अशी माहिती सिंग यांनी दिली आहे.
नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या 20 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येते. मात्र, आता ही संख्या वाढवून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या ३० व्यक्तींची तपासणी करण्याची तयार अमरावती प्रशासनाने सुरू केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, याचबाबत अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याशी देखील आम्ही संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी याबाबत अशी माहिती दिली की, इंदौरवरुन व्यापाराच्या निमित्ताने अमरावतीमध्ये येणाऱ्यांची आणि अमरावतीतून इंदौरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इंदौरमध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे. तिथल्या व्यक्ती इथे येत असल्याने आणि इथल्या व्यक्ती तिथे जात असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचा अंदाज अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्यातील फेब्रुवारी 2021 मधील आकडेवारी
बाधित रुग्ण – ३१२५९
बरे झालेले रुग्ण – २५४१३
मृत्यू – ४४०
अॅक्टिव्ह रुग्ण – ५४०४
३१ जानेवारी २०२१
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण – ४५,०७१
बाधित रुग्ण – २२,१५७
बरे झालेले रुग्ण – २१०१६
मृत्यू – ३९५
अॅक्टिव्ह रुग्ण ७४४
३१ डिसेंबर २०२०
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण ५२,९०२
बाधित रुग्ण – २०,०६४
बरे झालेले रुग्ण – १९,२७६
मृत्यू – ३८१
अॅक्टिव्ह रुग्ण ४०५