महाराष्ट्रातील ‘या’ पाच जिल्ह्यात कोरोना पसरतोय हातपाय!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 फेब्रुवारी) व्हीसीच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर राज्यात अशीच रुग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊन देखील करावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यावरुनच राज्यात कोरोनासंदर्भातील परिस्थिती गंभीर असल्याचं दिसून येत आहे. सध्या अमरावती, अकोला आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात आणि विशेषत: येथील शहरी भागात कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं दिसत आहे. मात्र, याशिवाय राज्यात असे पाच जिल्हे कोणते आहेत की, जिथे आजही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 21,00,884 जणांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. ज्यापैकी 19,94,974 जण बरे झाले आहेत. तर 51,788 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण 52,956 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. साधारण दोन महिन्यात राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसत होतं पण मागील तीन-चार दिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यातही अमरावती, यवतमाळ येथील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहेत.

गेल्या काही दिवसात लग्न समारंभ, बाजार, मॉलमधली गर्दी वाढतच आहे. परिणामी आता कोरोनाने राज्यात पुन्हा मान वर काढली आहे आणि पुन्हा आपल्या डोक्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. त्यामुळे आता राज्यातले कोणते जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेत ते जाणून घेऊया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नक्की वाचा: ‘..पुन्हा लॉकाडऊन परवडणार नाही’ राजेश टोपेंचं महाराष्ट्राला पत्र

अॅक्टिव्ह रुग्णांनुसार राज्यातील टॉप-5 जिल्हे

ADVERTISEMENT

1. पुणे – 10,321 (अॅक्टिव्ह रुग्ण) 4,00,426 (एकूण बाधित रुग्ण) 8,034 (एकूण मृत्यू)

ADVERTISEMENT

2. नागपूर – 6,797 (अॅक्टिव्ह रुग्ण) 1,44,813 (एकूण बाधित रुग्ण) 3,464 (एकूण मृत्यू)

3. ठाणे – 5,983 (अॅक्टिव्ह रुग्ण) 2,75,925 (एकूण बाधित रुग्ण) 5,779 (एकूण मृत्यू)

4. मुंबई – 5,859 (अॅक्टिव्ह रुग्ण) 3,19,128 (एकूण बाधित रुग्ण) 11,446 (एकूण मृत्यू)

5. अमरावती – 5,229 (अॅक्टिव्ह रुग्ण) 30,610 (एकूण बाधित रुग्ण) 432 (एकूण मृत्यू)

पुणे: पुणे जिल्ह्यात आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10 हजारांवर पोहोचली आहे. 16 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 82 हजार 172 होती. त्यानंतर मधल्या काळात ती साडेचार हजारांपर्यंत कमी झाली होती. पण नंतरच्या काळात कोरोनाचे नियम न पाळल्याने गेल्या 11 दिवसांत रुग्णसंख्येत वाढ झाली आणि आता ती 10 हजार 321वर जाऊन पोहोचली आहे. काल (21 फेब्रुवारी) जिल्ह्यात 634 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होते आहे. त्यामुळे पुणे हा राज्यातला सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेला जिल्हा आहे.

नागपूर: नागपूर शहरात गेला काही दिवसांपासून 500 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासात नागपूरमध्ये 717 रुग्ण आढळून आले आहेत. नागपूरमध्ये सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक गाठला होता. चाचण्यांची संख्याही तेव्हा 9 हजारांच्या वर गेलेली. त्यानंतर ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत इथे चाचण्यांचं प्रमाणही घटलं आणि रुग्णांचं प्रमाणही. लोकंही काहीसे निर्धास्त झाले. त्यामुळे आता गेल्या पाच दिवसांपासून आता इथेही सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दरम्यान, ग्रामीण भागातही कोरोना रुग्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सध्या पुण्याच्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत नागपूर हा 6797 अॅक्टिव्ह रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.

ही बातमी जरुर पाहा: मुख्यमंत्र्याच्या आवाहनानंतर शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय

ठाणे: पुणे आणि नागपूरनंतर अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत ठाणे हा क्रमांक तीनचा जिल्हा ठरला आहे. मागील 24 तासात ठाणे जिल्ह्यात 547 रुग्ण आढळले आहेत. अनलॉकपूर्वी ठाण्यातल्या कल्याण-डोंबिवलीमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत होती. मग धारावी पॅटर्ननुसार टेस्टिंगचं प्रमाण वाढवत इथली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं. पण त्यानंतर आता पुन्हा तिथल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आता तिथले अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 5,983 एवढी झाली आहे.

मुंबई: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मुंबई हा रुग्णसंख्या, अॅक्टिव्ह रुग्ण आणि मृतांची संख्या याबाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर होता. पण त्यानंतर प्रशासनाने येथे केलेल्या काटेकोर अंमलबजावणीनंतर रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात आली. पण आता पुन्हा एकदा मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत आता करोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असून आठवडाभरात रुग्णसंख्या चौपटीने वाढली आहे. दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तीनशेवरून पुन्हा हजारापर्यंत वाढल्याची नोंद झाली आहे. रविवारी नवीन रुग्णसंख्या 921 इतकी नोंदवली गेली, तर 4 जणांच्या मृत्यू झाला आहे. इथल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 5,859 वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत मुंबई राज्यात चौथ्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे.

अमरावती: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमरावतीत कालच (21 फेब्रुवारी) लॉकडाऊनची घोषणा केरण्यात आली आहे. गेल्या 24 तासात अमरावतीत रुग्णांची संख्या ही हजारच्या आसपास गेली आहे. हा आकडा काहीसा धक्कादायक आहे. कारण मुंबई आणि पुण्याच्या जवळपास जाणारा हा रुग्णांचा आकडा आहे. तसंच अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत अमरावती हा राज्यात पाचव्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. कारण इथे सध्या 5,229 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

अमरावती पाठोपाठ आता यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्येही मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. म्हणूनच हे जिल्हे आता अतिसंवेदनशील मानले जात आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT