आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती? , न्यायमुर्ती लळित कोण आहेत?

आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती? , न्यायमुर्ती लळित कोण आहेत?

सध्या महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात सुरू आहे. अशातच एक महत्वाची आणि अभिमानास्पद बाब म्हणजे, महाराष्ट्राचे सुपूत्र सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होणार आहेत.

नवी दिल्ली: सध्या महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात सुरू आहे. अशातच एक महत्वाची आणि अभिमानास्पद बाब म्हणजे, महाराष्ट्राचे सुपूत्र सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मराठी असलेले न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजजू यांच्याकडे केली आहे. नियुक्ती झाल्यास उदय उमेश लळित हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. पण, न्यायमूर्ती लळीत नेमके कोण आहेत? त्यांचा जीवनप्रवास कसा आहे? त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय कोणते होते? हे जाणून घेऊयात...

न्यायमूर्ती उदय उमेश लळित हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे सुपूत्र आहेत. गिर्ये-कोठारवाडी इथं त्यांचं मूळ घर आहे. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ ला झाला. लळीत घराण्यालाच वकिलीचा वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा, वडील, काका सर्वच वकिलीच्या व्यवसायात होते. उदय यांचे वडील उमेश लळित हे देखील वकील होते. तसेच ते मुंबई उच्च न्यायायलयाच्या नागपूर खंडपीठाचे अतिरिक्त न्यायमूर्ती देखील होते. त्यामुळे न्यायमूर्ती उदय लळित देखील वकिलीकडे वळले. त्यांचं शिक्षण मुंबईत झालं. त्यांनी जून १९८३ मध्ये वकिली सुरू केली.

१९८५ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयात होते. त्यानंतर १९८६ ला मुंबईतून दिल्ली उच्च न्यायालयात गेले. त्यांनी दिल्लीत सहा वर्षे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. ते २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करतायत. आता ते भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. न्यायमूर्ती लळित हे न्यायमूर्ती एस. एम सिकरी यांच्यानंतर दुसरे असे सरन्यायाधीश असतील ज्यांना बार असोसिएशनमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती देण्यात आली होती.

अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उदय लळित यांचा सहभाग

पण, त्यांची नियुक्ती फक्त ७४ दिवसांसाठी असणार आहे. कारण, लळित हे येत्या ८ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. मुळातच हुशार असलेल्या लळीत यांचा अनेक हायप्रोफाईल खटल्यांमध्ये सहभाग होता. सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी तलाकबद्दल महत्वपूर्ण निकाल दिला तेव्हा या खंडपीठात देखील लळीत यांचा सहभाग होता. देशात गाजलेला 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबधित अभियोग चालवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं उदय लळित यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती.

तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं स्कीन टू स्कीन कॉन्टॅक्ट बद्दल एक वादग्रस्त निर्णय दिला होता. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर न्यायमूर्ती लळित यांच्या खंडपीठानं हा निकाल रद्द केला होता आणि त्वचेशी थेट संपर्क नसला तरीही लैंगिक हेतूनं अल्पवयीन मुला-मुलींना केलेला स्पर्श POCSO अंतर्गत गुन्हा असेल, असा निर्णय दिला होता. अशा अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये सहभाग असलेल्या न्यायमूर्ती लळीत यांनी गाजलेल्या अयोध्या खटल्यातून स्वतःला दूर केले होते.

अयोध्या खटल्यामध्ये स्वत: ला ठेवलं होतं दूर

कारण, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी सुप्रीम कोर्टाला बाबरीबाबत वचन दिले होते. पण, ते वचन न पाळल्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कल्याण सिंह यांना तुरुंगवास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. याच प्रकरणात लळित यांनी कल्याण सिंह यांची बाजू मांडली होती. त्यामुळे न्यायमूर्ती लळित यांनी अयोध्या खटल्यापासून स्वतःला दूर केलं होतं.

उदय लळित यांची नियुक्ती ही ७४ दिवसांसाठी

लळीत यांची नियुक्ती ही ७४ दिवसांसाठी असणार आहे. देशाला गेल्या एप्रिलपासून ते नोव्हेंबरपर्यंत या ६ महिन्यात ३ सरन्यायाधीश मिळणार आहेत. न्यायमूर्ती लळित नोव्हेंबरमध्ये निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे सरन्यायाधीश बनतील आणि ते सुद्धा मराठी आहेत. ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in