डोंबिवली : पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने…; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं

मुंबई तक

डोंबिवलीतील दावडी परिसरात असलेल्या ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये मृतदेह आढळून आला होता. विवाहितेची हत्या करून मृतदेह लपवल्याचं पोलिसांनी प्रथम दर्शनी म्हटलं होतं. या प्रकरणात गूढ अखेर उकललं असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे. 33 वर्षीय सुप्रिया शिंदे या विवाहित महिलेची शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या तरुणाने हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

डोंबिवलीतील दावडी परिसरात असलेल्या ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह घरातील सोफा-कम-बेडमध्ये मृतदेह आढळून आला होता. विवाहितेची हत्या करून मृतदेह लपवल्याचं पोलिसांनी प्रथम दर्शनी म्हटलं होतं. या प्रकरणात गूढ अखेर उकललं असून, धक्कादायक माहिती समोर आली आहे.

33 वर्षीय सुप्रिया शिंदे या विवाहित महिलेची शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या तरुणाने हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. आरोपी विशाल घावट याने सुप्रिया शिंदे यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार केल्यानंतर आरोपीने त्यांची निर्घृण हत्या केली.

डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये किशोर शिंदे त्यांची पत्नी सुप्रिया शिंदे आणि दहा वर्षांच्या मुलासह वास्तव्यास आहेत. 15 फेब्रुवारी रोजी किशोर शिंदे नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेले, तर त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. किशोर सायंकाळी घरी परतले तेव्हा यांची पत्नी सुप्रिया घरी नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे विचारपूस केली, मात्र ती कुठेही आढळून आली नाही.

अखेर रात्रीच्या सुमारास किशोर हे पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात गेले. याचवेळी घरी असलेल्या नातेवाईकांना सुप्रिया यांचा मृतदेह घरातील सोफा कम बेड सेटमध्ये आढळून आला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मानपाडा पोलिसांनी एसीपी डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु केला.

सुप्रिया शिंदे यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं झाल्यानंतर पोलिसांना कोणताही पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे हत्या का आणि कुणी केली? हे गुलदस्त्यात होतं. आरोपीला शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते.

तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचं पोलिसांना सांगितलं. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत चप्पल कोणती, हे निष्पन्न केलं. अखेर शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट याची चप्पल असल्याचं तपासातून समोर आलं.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी सुप्रिया यांचा मुलगा शाळेत गेला होता, तर पती कामावर निघून गेले होते. सुप्रिया यांना वाचनाची आवड असल्याने विशाल पुस्तक देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी गेला.

सुप्रिया या घरी एकट्याच असल्याचं बघून विशालने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रिया यांनी त्याला प्रतिकार केला. यावेळी विशालने सुप्रिया यांचं डोकं फरशीवर आपटलं. त्यानंतर टायने गळा आवळून त्यांची हत्या केली. नंतर त्यांचा मृतदेह घरातीलच सोफासेटमध्ये लपवून ठेवला.

आरोपी पोलीस स्टेशनमध्येही गेला

धक्कादायक म्हणजे सुप्रिया घरी नसल्यानं त्यांचे पती किशोर हे मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले होते. त्या वेळेला आरोपी विशाल हा त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यात गेला होता. या प्रकरणात काहीही पुरावा नसताना फक्त चपलेवरुन पोलिसांनी हत्या करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

सीसीटीव्ही बसवण्याचं आवाहन

या इमारतीत आणि आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचं देखील आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp