नेपाळमध्ये विमानाचा भीषण अपघात, 4 भारतीयांसह 22 जण होते विमानात

नेपाळमध्ये एकूण 22 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात झाल्याचं धक्कादायक वृत्त नुकतंच समोर आलं आहे. या विमानात 4 भारतीय प्रवासी देखील होते.
wreckage of missing plane found in nepal 22 people including 4 indians were on board
wreckage of missing plane found in nepal 22 people including 4 indians were on boardफोटो सौजन्य: ANI

काठमांडू: नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणारं प्रवासी विमानाचा अपघात झाल्याचं अखेर समोर आलं आहे. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 22 लोक होते. ज्यामध्ये चार भारतीय नागरिकांचा देखील समावेश होता. सकाळी 10.07 वाजल्यापासून विमानाशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाने सांगितले. अखेर दुपारी चारच्या सुमारास विमानाचे अवशेष सापडले. त्यामुळे आता विमानाचा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या घटनास्थळी तपास सुरू असल्याचे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रमुखांनी सांगितले. त्याचवेळी नेपाळच्या लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी सैन्य जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळी रवाना झाले आहेत.

याआधी, जोमसोम विमानतळाच्या वाहतूक नियंत्रकाने सांगितले होते की 'घासामध्ये एक मोठा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. परंतु याची पुष्टी होऊ शकलेली नाही. स्फोट झालेल्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे याचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. स्फोटाच्या ठिकाणी विमानाचा शेवटचा संपर्क झाला होता.' असेही त्यांनी सांगितले होते.

दुसरीकडे, विमान बेपत्ता झाल्यानंतर खराब हवामानामुळे त्याचा शोध घेण्यात अनेक अडचणी आल्या. विमानाचे अवशेष सापडल्यानंतर आता पुढील कारवाई सुरू आहे. या प्रवासी विमानात 13 नेपाळी, चार भारतीय, दोन जर्मन आणि तीन क्रू मेंबर्स होते.

तारा एअरने दिलेल्या माहितीनुसार, कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर अशी विमानातील चार भारतीयांची नावे आहेत. याशिवाय इंद्र बहादूर गोले, पुरुषोत्तम गोले, राजनकुमार गोले, बसंत लामा, गणेश नारायण श्रेष्ठ, रवीना श्रेष्ठ, रश्मी श्रेष्ठ, रोजिना श्रेष्ठ, प्रकाश सुनुवर, मकर बहादूर तमांग, राममाया तमांग, सुकुमाया तमांग, तुलसी देवी तमांग, अश्मी देवी तमांग, डॉ. माईक ग्रीट, उवे विल्नर. हे प्रवासी होते.

तारा एअरचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनीही सुरुवातीला विमान बेपत्ता झाल्याचं म्हटलं होतं. तसंच शोध मोहीम देखील सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. कॅप्टन प्रभाकर प्रसाद घिमिरे, सहवैमानिक इटासा पोखरेल आणि एअर होस्टेस कासमी थापा हे या विमानात होते.

दुसरीकडे नेपाळ पोलिसांच्या प्रवक्त्याने 'आज तक'ला सांगितले की, 'तारा एअरलाइन्सचे विमान मुस्तांगला जात होते. जे नंतर अचानक गायब झाले. नेपाळी लष्कर हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता विमानाचा शोध घेत आहे. मुस्तांग परिसरातील पोलीस, नेपाळचे सैनिक शोध मोहिमेत गुंतले आहेत.'

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in