विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर; शिंदे गटाला काय मिळालं?

Vidhan Parishad Election : देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धूळ चारणार?
CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis
CM Eknath Shinde and DCM Devendra FadnavisMumbai Tak

मुंबई : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १२ जानेवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी भाजपने या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने कोकण शिक्षक मतदारसंघातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पुन्हा एकदा तिकीट दिलं आहे. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून किरण पाटील उमेदवार देण्यात आली आहे. सोबतचं अमरावती पदवीधरमधून पुन्हा विद्यमान आमदार रणजीत पाटील यांना संधी दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत पाच पैकी तीन नावांची घोषणा केली. तर नाशिक पदवीधर आणि नागपूर शिक्षक या जागांवर अद्याप पेच कायम आहे. मात्र या जागांवरही लवकरच निर्णय होऊन उमेदवारांची घोषणा होईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या समन्वयाने पाचही विधानपरिषदेच्या जागा लढविणार असल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

शिंदे गटाला काय?

नागपुरमध्ये विद्यमान आमदार नागो गाणार यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नसल्याचं यावेळी बावनकुळे यांनी सांगितलं. तर नाशिकची जागाही भाजप लढविणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. भाजपकडून डॉ. राजेंद्र विखे (नगर) धनराज विसपुते (धुळे), हेमंत धात्रक (नाशिक) इच्छुक आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार नसणार हे स्पष्ट आहे.

महाविकास आघाडीचं काय?

महाविकास आघाडीनेही पाच पैकी अद्याप तीनच जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यात औरंगाबाद शिक्षकसाठी राष्ट्रवादीने विक्रम काळेंना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर कोकणमध्ये शेकापकडून बाळाराम पाटील हे मविआचे उमेदवार असणार आहेत. नाशिक पदवीधरसाठी सुधीर तांबेंना पुन्हा एकदा काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही. अमरावती आणि नागपुरच्या जागेचा मविआत अजून निर्णय नाही.

निवडणूक जाहीर झालेल्या ५ सदस्यांची मुदत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपणार आहे. यात राष्ट्रवादी १, भाजप १, काँग्रेस १ आणि दोन अपक्ष सदस्यांचा समावेश आहे.

मुदत संपणाऱ्या सदस्यांची नावं :

 • नाशिक पदवीधर - सुधीर तांबे - काँग्रेस

 • अमरावती पदवीधर - रणजीत पाटील - भाजप

 • औरंगाबाद शिक्षक - विक्रम काळे - राष्ट्रवादी काँग्रेस

 • कोकण शिक्षक - बाळाराम पाटील - अपक्ष

 • नागपूर शिक्षक - नागो गाणार - अपक्ष

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम :

 • अधिसूचना जारी - ५ जानेवारी २०२३

 • उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - १२ जानेवारी २०२३

 • उमेदवारी अर्जाची छाननी - १३ जानेवारी २०२३

 • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - १६ जानेवारी २०२३

 • मतदान - ३० जानेवारी २०२३ (सकाळी ८.०० ते दुपारी ४.००)

 • मतमोजणी - २ फेब्रुवारी २०२३

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in