Advertisement

अब्दुल सत्तरांचे ग्रह फिरलेत?; आधी फडणवीसांनी सुनावलं, आता न्यायालयानं फटकारलं

औरंगाबाद खंडपीठाने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दणका दिला आहे.
अब्दुल सत्तरांचे ग्रह फिरलेत?; आधी फडणवीसांनी सुनावलं, आता न्यायालयानं फटकारलं

औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं ग्रह सध्या फिरले, तर नाही ना? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशाच घटना त्यांच्याबाबतीत घडताना दिसताहेत. ऐन मंत्रिमंडळ विस्ताराच्या काळात टीईटी घोटाळ्यात सत्तारांचे नाव आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची परस्पर घोषणा केल्यावरून सत्तारांचे कान पिळले. त्यानंतर लगेच आज न्यायालयानं आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तारांनी घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे.

अब्दुल सत्तरांविरोधात न्यायालयानं स्थगिती दिलेलं प्रकरण काय?

औरंगाबाद खंडपीठाने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना दणका दिला आहे. राज्य महसूल मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या एका आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बाजार समितीच्या एका जागेचं प्रकरण न्यायप्रविष्ट झालं होतं, त्यानंतर न्यायालयाने व्यवहाराला मान्यता दिली असताना देखील तत्कालीन महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती. तर याचवेळी त्यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या विरोधात संबंधित लोकं न्यायालयात गेले असता न्यायालयाने अब्दुल सत्तारांच्या आदेशाला स्थगिती देत भूखंडावरील स्थगिती उठवली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना काय सुनावले?

शिंदे-फडणवीस सरकारची सोमवारी मंत्रिमंडळ बैठक पार पडली यामध्ये सरकारनं अनेक निर्णय घेतले. यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना सुनावल्याची चर्चा आहे. लोकसत्तानं दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारचे काही निर्णय परस्पर जाहीर केल्यामुळं फडणवीस सत्तारांवर चांगलेच संतापले होते. तसंच यापुढे परस्पर निर्णय जाहीर करु नका असे आदेशही फडणवीसांनी सत्तार आणि इतर मंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या सर्व नाट्यानंतर मंत्र्याना समज दिली आहे.

अब्दुल सत्तारांचे टीईटी घोटाळ्यात नाव कसे आले?

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. आरोग्य भरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाचा पुणे पोलीस तपास करीत असतानाच हा शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) घोटाळा उघडकीस आला होता.

राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या सात हजारांहून अधिक उमेदवारांच्या यादीमध्ये सिल्लोडचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींच्या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन मुलींची नावं असलेली यादी समोर आली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in