Tata Airbus : ४ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, उदय सामंत राजीनामा देणार का? - आदित्य ठाकरे

टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर उदय सामंत आणि शिंदे सरकारवर टीका
Uday Samant - Aditya thackeray
Uday Samant - Aditya thackerayMumbai Tak

मुंबई : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला 'टाटा एअरबस' हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे. लष्करी विमान निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश ही भाजपशासित राज्यही प्रयत्नशील होती. अखेरीस हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यामध्ये होणार असल्याची माहिती आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दिली. तसंच या प्रकल्पाची पायाभरणीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

टाटा एअरबसचा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाताच शिंदे सरकार आणि उदयोग मंत्री उदय सामंत यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ४ प्रकल्प महाराष्ट्रबाहेर गेले आहेत, आता तरी उद्योग मंत्री उदय सामंत राजीनामा देणार का? असा सवाल विचारला आहे.

उदय सामंत राजीनामा देणार का?

आदित्य ठाकरे ट्विट करुन म्हणाले, आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर! मी जुलै महिन्यापासून खोके सरकारकडे या टाटा एअर बस प्रकल्पासाठी प्रयत्न करण्यास सांगत होतो. मला आश्चर्य वाटतं मागील ३ महिन्यांपासून प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात का जात आहे? हा खोके सरकारने औद्योगिक पातळीवर विश्वास गमावला असल्याचा पुरावा आहे. चौथा प्रकल्प महाराष्ट्रबाहेर गेला आहे, आता तरी उद्योग मंत्री उदय सामंत राजीनामा देणार का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

तसंच डबल इंजिनचं हे सरकार असल्याचं म्हटलं जातं. पण राज्य सरकारचं इंजिन फेल आहे. आम्ही सत्तेत असताना दावोसमध्ये ८० हजार कोटी असतील किंवा कोरोनाच्या काळात देखील साडे सहा लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती. एकनाथ शिंदे दिल्लीला जातात पण ते स्वतःसाठी जातात. हे सरकार स्वत:साठी काम करत आहे, अशीही टीका आदित्य ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.

भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल :

राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातने पळविल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बेरोजगांना टाटाचा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचं आश्वासन दिलं होतं. हा प्रकल्प मिहानमध्ये नागपूरमध्ये होईल असं सांगितलं होतं. पण परत एकदा गुजरातने महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक केला आणि एकनाथ शिंदे फक्त बघत राहिले. महाराष्ट्रामध्ये प्रकल्प आणि गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने शिंदे सरकार पूर्णपणे विफल झालं आहे. राज्यकर्त्यांच्या या चुकीच्या कारभाराची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल, असही तपासे यांनी म्हटलं.

काय आहे टाटा एअरबस प्रकल्प?

मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीने 8 सप्टेंबर 2021 रोजी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स अँड स्पेस एस. ए. कडून 56 सी-295 एमडब्लू विमान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी याबाबतचा करारही करण्यात आला. या कराराअंतर्गत, 16 विमाने तयार अवस्थेमध्ये तर 40 विमानं भारतीय विमान कंत्राटदार, टाटा समूह, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड (टीएएसएल) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), नेतृत्वाखाली भारतात तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 21,935 कोटी रुपये आहे. या विमानाचा वापर नागरी उद्देशांसाठीही केला जाऊ शकतो, असं संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी सांगितलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in