मनसेच्या गोटात हालचालींना वेग; अमित ठाकरेंची वसंत मोरेंशी बैठक : मध्यस्थी यशस्वी होणार?

‘तात्या, कधी येताय, वाट पाहतोय’, अजित पवारांची मोरेंना खुली ऑफर
Amit Thackeray - Vasant More
Amit Thackeray - Vasant MoreMumbai Tak

पुणे : मनसेचे माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांची नाराजी दूर करण्यासाठी आता मनसे नेते अमित ठाकरे यांनी मध्यस्थी केली आहे. अमित ठाकरे आज पुणे दौर्‍यावर आले असून दुपारी वसंत मोरे यांना त्यांनी भेटीसाठी बोलावलं आहे. लॉ कॉलेज रोडवरील 'राज महाल' येथे ही भेट होणार आहे. या भेटीत वसंत मोरे आणि अमित ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा होते, त्यांची नाराजी दूर होते याकडे मनसे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.

वसंत मोरे हे काही दिवसांपासून पक्षात नाराज आहे. त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा उघडउघड बोलून दाखविली आहे. आपल्याला शहरातील काही प्रमुख नेते मंडळी पक्षापासून आणि पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर ठेवत आहे, असा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यामुळे अनेकदा ते मनसे सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत असतात.

त्याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्न समारंभ दरम्यान भेट झाली. त्यावेळी ‘तात्या, कधी येताय, वाट पाहतोय’, अशा शब्दात अजित पवार यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली.

त्याबाबत वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, 'माझ्याबाबत पक्षामध्ये ज्या काही घटना घडत आहे. त्याला बाबू वागसकर हेच जबाबदार आहेत. तसेच मी आजही राज ठाकरेंसोबतच आहे.' अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

वसंत मोरे यांच्या आरोपांविषयी बाबू वागसकर यांना विचारले असता ते म्हणाले होते की, वसंत मोरेंबाबत येत्या २ दिवसात सविस्तर खुलासा केला जाईल, आजच्या बैठकीत त्यांच्याबाबत काही चर्चा झाली नाही. पण अद्यापपर्यंत बाबू वागसकर यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. त्यापूर्वीच मोरे यांना ठाकरेंनी भेटीसाठी बोलावलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in