Anil Deshmukh Case Chronology : अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार पण अडकले कसे होते?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Anil Deshmukh Bail: मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. ईडीच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात जामीन मिळूनही सीबीआय खटल्यात अनिल देशमुखांना तुरुंगात रहावं लागलं होतं. मात्र आता अखेर या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुख यांची जामिनावर (Bail) सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, राज्याचे गृहमंत्री ते तुरुंगातील वर्षभराचा मुक्काम या सगळ्यात बरंच काही घडून गेलं. ज्यामुळे महाराष्ट्रातील सगळं राजकारण पूर्णपणे ढवळून गेलं होतं. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची नेमकी सुरुवात कशी झाली हे आपण एका विशेष रिपोर्टमधून समजून घेऊयात. (antelia sachin waze and 100 crores how was ncp leader anil deshmukh stuck in thick of the law see detailed report)

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी 2021 रोजी एक संशयित कार सापडली होती. ज्यामध्ये 20 जिलेटीनच्या कांड्याही सापडल्या होत्या. या एका घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. अंबानी कुटुंबीयांशी संबंधी ही घटना असल्याने हे प्रकरण खूपच हाय-प्रोफाइल बनलं होतं. सुरुवातीला ही घटना दहशतवाद्यांशी निगडीत असल्याची चर्चा होती. पण, जसजसे या प्रकरणी काही प्रश्न उपस्थित होत गेले तसतसं यातील गुंता अधिकच वाढला. दरम्यान, या सगळ्यात प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याच्या अटकेपासून सुरु झालेलं हे प्रकरण थेट अनिल देशमुखांची अटक इथवर जाऊन पोहचलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सगळ्या प्रकारामुळे अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. खरं तर हे संपूर्ण प्रकरण जेव्हा सुरु झालं तेव्हा विरोधकांच्या रडारवर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे अजिबात नव्हते. मात्र, काही घटना अशा घडल्या की, या प्रकरणात अनिल देशमुखांचा पाय अधिकच अडकत गेला. या सगळ्यात अनिल देशमुख नेमके कसे अडकत गेले हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना का द्यावा लागलेला राजीनामा?

25 फेब्रुवारी 2021 रोजी अंबानींच्या घराखाली संशयित कार सापडली होती. ज्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या आणि धमकीचं पत्र आढळून आलं होतं. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ ते तपासासाठी क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलेलं. त्यावेळी त्याचे तपास अधिकारी होते एपीआय सचिन वाझे. सुरुवातीचे दोन दिवस याचा तपास दहशतवाद्यांच्या अँगलने करण्यात आला होता. दरम्यान, काही दिवस या प्रकरणात फारशी गती दिसून आली नव्हती.

ADVERTISEMENT

…अन् अँटेलिया प्रकरणाला लागलं राजकीय वळण

4 मार्च 2021 रोजी या प्रकरणी तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेबाबत काही प्रश्न उपस्थित केलेले. दरम्यान, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 मार्च 2021 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी थेट विधानसभेत स्कॉर्पिओ गाडीचा मालक आणि वाझे यांचा संबंध असल्याचा प्रचंड मोठा गौप्यस्फोट केला होता. ज्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागलं. सुरुवातीला फडणवीस यांनी केवळ तपास अधिकारी सचिन वाझेवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, याच दिवशी मनसुख हिरेन याचा मृतदेह कळव्याच्या खाडीत सापडला आणि त्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं. अखेर या सगळ्याचा प्रकरणाचा तपास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ATS कडे सोपवला होता.

ADVERTISEMENT

Anil deshmukh : अनिल देशमुखांना उच्च न्यायालयाकडून जामीन, पण 10 दिवस…

याचवेळी अँटेलियाप्रकरणात पहिल्यांदा सचिन वाझे हे रडारवर आले. सचिन वाझे हे माजी शिवसैनिक असल्याने भाजपने सरळसरळ शिवसेनेवर निशाणा साधायला सुरुवात केली होती. दुसरीकडे याप्रकरणी शिवसेना आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे काळ स्वत: सचिन वाझेची पाठराखण करत असताना दिसून आले होते.

या सगळ्या काळात विधीमंडळाचं अधिवेशन देखील सुरु होतं. त्यामुळे विरोधक याबाबतचे प्रत्येक आरोप हे सभागृहात करत होते. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेवर आरोप करणं सुरु केलं होतं तेव्हा अनिल देशमुख आणि शिवसेनेचे तत्कालीन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

यावेळी विरोधी पक्षाकडून वाझेला अटक करावी अशी मागणी विधानसभेत सातत्याने करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. यावेळी फडणवीसांनी सभागृहात असंही म्हटलं होतं की, ‘वाझेंना निलंबित करण्याचा शब्द विधानसभा अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आला होता. मात्र, आता गृहमंत्र्यांनी आपला शब्द फिरवला. ते सचिन वाझे यांना पाठीशी घालत आहे.’

सचिन वाझेंची अटक आणि अनिल देशमुख विरोधकांच्या रडारवर

सचिन वाझेचं निलंबन करुन त्याला अटक करावी अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत होती. मात्र तरीही राज्य सरकारने त्याच्यावर अटकेची कारवाई न करता 10 मार्च 2021 रोजी गृहमंत्र्यांनी केवळ सचिन वाझेची क्राइम ब्रांचमधून बदली करण्याचा निर्णय घेतला.

याच दरम्यान हा सगळा तपास केंद्रीय तपास यंत्रणेतील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एनआयएकडे (NIA) गेला आणि 13 मार्च 2021 रोजी एनआयएने सचिन वाझेला अँटेलिया प्रकरणी अटक केली. सचिन वाझेच्या अटकेनंतर पहिल्यांदाच अनिल देशमुख हे भाजपच्या रडारवर आले होते. वाझेंना अटक झाल्यादिवशी सर्वात आधी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुखांना गृहमंत्री पदावरुन हटविण्याची मागणी केली होती.

ईडीची याचिका फेटाळली! अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

आयुक्तांची बदली अन् विरोधकांकडून गृहमंत्र्यांवर निशाणा

या प्रकरणातील गुंता हा दिवसेंदिवस वाढत चालला होता. ज्यामुळे तत्कालीन ठाकरे-पवारची बरीच नाचक्की झाली होती. यामुळे काही तरी ठोस निर्णय घेणं अनिल देशमुखांना क्रमप्राप्त होतं. म्हणूनच 17 मार्च 2021 रोजी अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन जाहीर केलं की, मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंग यांना हटविण्यात येत आहे. याचवेळी एनआयए अँटेलिया प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक खुलासे करत होते. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरील टीका ही अधिकच वाढली होती.

अनिल देशमुखांचं खळबळजनक वक्तव्य

दरम्यान, 18 मार्च 2021 रोजी एका कार्यक्रमातील मुलाखतीत अनिल देशमुख हे असं म्हणाले होते की, ‘अँटेलिया कार प्रकरणी तपासात आयुक्तांकडून काही चुका झाल्या आणि या चुका माफ करण्यासारख्या नव्हत्या. म्हणूनच परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली.’ अनिल देशमुख यांचं हे वक्तव्य खूपच खळबळजनक होतं. त्यामुळे वाझे प्रकरणात तत्कालीन मुबंई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या भूमिकेबाबतच प्रश्न निर्माण झाला होता.

परमबीर सिंगांनी टाकलेला 100 कोटींचा लेटरबॉम्ब

अनिल देशमुखांच्या या वक्तव्यानंतर अगदी दोनच दिवसांनी म्हणजे 20 मार्च 2021 रोजी तत्कालीन ठाकरे सरकारवर एक लेटरबॉम्ब पडला होता. जे होतं मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं. या पत्रात परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर अत्यंत गंभीर असे आरोप केले होते. या पत्रात अनिल देशमुखांनी सचिन वाझेकडे महिन्याला 100 कोटींची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता.

परमबीर सिंग यांच्या या पत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठा भूकंप झाला होता. एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने अशा प्रकारे थेट गृहमंत्र्यांवर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ होती. ज्यानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदाच आरोपीच्या पिंजऱ्यात आले.

‘गृहमंत्र्यांला १०० कोटी कोण देतं हो?’ छगन भुजबळांकडून अनिल देशमुख यांची पाठराखण

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी विरोधक झालेले आक्रमक

परमबीर सिंगाचं पत्र समोर येताच भाजपने अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांची कसून चौकशी करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. पण थेट आयपीएस अधिकाऱ्याचं पत्रच हाती असल्याने भाजपने याबाबत अनिल देशमुखांना गृहमंत्री पदावरुन हटविण्यासाठी राज्यभरात आंदोलनं सुरु केली होती.

परमबीर सिंग यांनी घेतलेली कोर्टात धाव

गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत परमबीर सिंह यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सुनावणी घेत आपण याप्रकरणी हायकोर्टात जावं असे निर्देश दिले होते.

यावेळी हायकोर्टाने दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतला होता. त्यावेळी कोर्टाने काही निरिक्षणं देखील नोंदवली होती. मात्र, या याचिकेसंदर्भातील निकाल राखून ठेवला होता. अखेर 5 एप्रिल 2021 रोजी कोर्टाने याबाबतचा निकाल देताना अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कोर्टाच्या याच आदेशानंतर अनिल देशमुख यांनी तात्काळ आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला होता.

अनिल देशमुखांना अटक

एकीकडे सीबीआयची चौकशी सुरु असताना दुसरीकडे ईडीचा देखील ससेमिरा अनिल देशमुखांच्या मागे सुरु होता. त्यातच वारंवार ईडीकडून अनिल देशमुखांच्या घरावर, कार्यालयांवर छापेमारी केली जात होती. अनेकदा अनिल देशमुखांना चौकशीसाठी समन्सही बजावलं जात होतं. मात्र, अनेक महिने अनिल देशमुख हे ईडीसमोर हजर राहिले नव्हते. अखेर 2 नोव्हेंबर 2021 रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती.

अनिल देशमुखांना जामीन मंजूर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांना ईडी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआय प्रकरणात अटक असल्याने अनिल देशमुखांना तुरुंगातच राहावं लागलं होतं. अखेर आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे उद्या (२८ डिसेंबर) अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT