Vidhansaba Bypoll: कसबा पोटनिवडणुकीबाबत भाजपने घेतला मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kasba by-election and BJP: पुणे: पुण्यातील (Pune) कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड या विधानसभेच्या (Vidhansabha) दोन मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक (By Poll) होणार आहे. याच निवडणुकीमुळे सध्या प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, त्यातही कसबा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप (BJP) कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (bjp took a big decision regarding kasba by election sent names of 5 candidates to central election committee)

आता कसबा पोटनिवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील भाजपने केंद्रीय निवड समितीला 5 नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक या दोन नावांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांचीही नावे निवड समितीला देण्यात आली आहेत.

भाजपने कसबा आणि पिंपरी-चिंचवडसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. तीन दिवसात भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडून निश्चित उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्यासाठीच भाजपकडून पाच नावांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

By elections : लक्षात ठेवा! चिंचवड-कसबा पेठ पोटनिवडणुकीची तारीख बदलली

एखाद्या आमदाराच्या निधनाने जागा रिकामी झाली असेल तर ती निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. परंतु गेल्या काही निवडणुकांमध्ये या परंपरेला बगल दिल्याने सर्वच पक्ष आता हि पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. भाजपकडून ही निवडणूक बिरविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत, परंतु आम्ही गाफील राहणार नाही असं खुद्द चंद्रकांत पाटीलच म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

मुक्ता टिळक यांच्या निधनाला केवळ तीन आठवडे झालेले असताना निवडणुक आयोगाकडून कसब्याची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे निवडणूक झाल्यास कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच भाजपसह सर्वच पक्षांना पडला आहे. भाजपकडून माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे त्याचबरोबर गणेश बीडकर हे इच्छुक आहेत. तर दुसरीकडे मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातूनच या जागेवर दावा सांगण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

‘पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं’ मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केलं होतं. त्याचबरोबर मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक हे देखील उत्सुक आहेत. कुणाल टिळक हा भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष आहे. यामुळे भाजपने ही दोन्ही नावं केंद्रीय निवड समितीकडे पाठवली आहेत.

दुसरीकडे रासने, घाटे आणि बीडकर या तिघांचं देखील या मतदार संघामध्ये वजन आहे. त्यामुळे उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी हे तिघेही आपआपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत.

कसबा पोटनिवडणूक 2023 : पुन्हा कमळ फुलवण्यासाठी भाजपची ‘समिती’ रणनीती!

मेधा कुलकर्णींना पुन्हा डच्चू?

दुसरीकडे भाजपने जर शैलेश टिळक किंवा कुणाल टिळक यांना उमेदवारी दिल्यास या दावेदारांची पंचायत होण्याची शक्यता आहे. तिकडे कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी डावलून चंद्रकांत पाटील हे 2019 ला कोथरुडमधून निवडून आल्याने कुलकर्णी नाराज होत्या. त्यामुळे त्याना कसब्यात संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते अशीही चर्चा होती. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवड समितीकडे मात्र मेधा कुलकर्णींचं नाव पाठविण्यात आलेलं नाही.

कसबा हा भाजपचा गड असला तरी विरोधकांकडून या गडाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरु आहेत. मनसेकडून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा त्या कसब्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. तर क़ॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांनी देखील ही जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे भाजपसाठी हि निवडणूक सोपी नसणार आहे. परंतु त्या आधी नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय भाजपला घ्यावा लागणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT