मुंबई: काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपने आपले तिसरे उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणले. काल झालेल्या चुरशीच्या लढतीत आणि पहाटेपर्यंत चाललेल्या मतमोजणीत भाजपने बाजी मारली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी खास शैलीत ट्विट केले आहे. संभाजी राजेंनी संत तुकाराम महाराजांचा अभंग ट्विट केला आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
हा अभंग ट्विट करत संभाजी राजेंनी शिवसेनेवरती निशाणा साधला असल्याची टीका आहे. परंतु या अभंगाचा नेकमा अर्थ काय हे जाणून घेऊ. ”वाघाचे पांघरुन घेतल्यावर वाघासारखे दिसते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते.”
संभाजी राजेंना सुरवातीच्या टप्प्यात शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल असे वाटत होते. परंतु, शिवसेनेकडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या त्या अटी संभाजी राजेंनी मान्य केल्या नाहीत आणि राज्यसभा निवडणुकीतून शेवटच्या क्षणाला माघार घेतली.
दरम्यान काल राज्यसभेचा निकाल आल्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्याची टीका केली आहे आणि त्यांनी त्या सहा आमदारांची नावंही सांगितली आहेत. काही बाजारातले घोडे विकले गेले, कदाचित त्यांच्यावर जास्त बोली लावली असेल. आम्हाल मतदान करणार असणाऱ्या सहा आमदारांनी भाजपला मतदान केले. बहुजन विकास आघाडीचे तीन, श्यामसुदंर शिंदे, देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे यांनी आम्हाला मतदान केले नाही असे संजय राऊतांनी स्पष्ट सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले आमचा पराभव…
‘मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता. अपक्षांची मते विरोधकांना मिळाली.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली. आपल्यासाठी हा निकाल अनपेक्षित नव्हता. राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि उद्धव ठाकरेंनी ती रिस्क घेतली. असंही शरद पवार यावेळी म्हणाले.