मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लीलाधर डाकेंच्या भेटीला, मनोहर जोशींनाही भेटणार

शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याच्या चर्चांना उधाण
Eknath Shinde Meets leeladhar Dake today
Eknath Shinde Meets leeladhar Dake today

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच लीलाधर डाके यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर आज संध्याकाळी पाचच्या सुमारास एकनाथ शिंदे हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचीही भेट घेणार आहेत. २१ जूनला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी जे बंड केलं त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. आता शिवसेना दोन गटात दुभंगली असून एक शिंदे गट तर दुसरा ठाकरे गट तयार झाला आहे.

शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांना आपल्याकडे वळवणार एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत. डाके यांच्या घरी जाऊन एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. तर मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदे आपल्याकडे वळवणार का? या चर्चांना आता उधाण आलं आहे.

लीलाधर डाकेंच्या भेटीनंतर काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला मी आलो होतो. लीलाधर डाके यांचं योगदान मी पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अगदी सुरूवातीला जे नेते होते त्यातले लीलाधर डाके होते. शिवसेना पूर्वी वाढवण्याचं काम लीलाधर डाके यांनी केलं आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना त्यांनी त्यावेळी केला. आता जी वाढलेली शिवसेना पाहतोय त्यात लीलाधर डाकेंसारख्या मोठ्या नेत्यांचं योगदान आहे. साधी राहणी आणि पक्ष वाढवण्याचा विचार हा त्यांनी मनात रूजवला. बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानेच त्यांनी काम केलं. बाळासाहेबांची शिवसेना ही आता पुढे जाते आहे. मी डाकेसाहेबांना भेटायला आलो होतो. ही सदिच्छा भेट होती.

एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता या गटाला चांगलंच समर्थन मिळताना दिसतं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर ताबा मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीला एकनाथ शिंदे जात आहेत. शिवसेनेचे जे लोकसभेतले खासदार आहेत त्यातल्या १२ खासदारांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर ४० आमदार हे आधीच एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत आता पुढे काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेत आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे दोन गट

शिवसेनेत पडलेल्या या फुटीमुळे शिवसेना दुभंगली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट तयार झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना तुमचीच शिवसेना कशी खरी? याचे पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे. ८ ऑगस्टपर्यंतची मुदत यासाठी देण्यात आली आहे. आता एकनाथ शिंदे नेमकं काय काय करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in