एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल झाले?

एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार आहेत असा दावा केला आहे
Shiv Sena leader Eknath Shinde reached Guwahati with his MLAs team
Shiv Sena leader Eknath Shinde reached Guwahati with his MLAs teamMumbai Tak

२१ जून २०२२ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस ठरला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातच एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले आहेत. भाजपने विधान परिषदेच्या पाच जागा जिंकल्या आणि त्याच रात्री एकनाथ शिंदेंसह ४० आमदार सुरतला पोहचल्याची बातमी समोर आली.

शिवसेनेला मोठा हादरा देणारी ही बातमी ठरली आहे. सुरूवातीला १० ते १२ आमदार त्यांच्यासोबत आहेत या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता माझ्यासोबत ४० आमदार आहेत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेत झालेलं हे बंड अभूतपूर्व असंच आहे. कारण शिवसेना सत्तेत असताना आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना!

Eknath Shinde says 33 MLAs With Me
Eknath Shinde says 33 MLAs With Me

महाविकास आघाडीची सत्ता टिकणार का? काय आहेत शक्यता?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला ३७ आमदारांचं पाठबळ मिळालं, तर महाविकास आघाडी सरकार पडणार. पक्षांतरबंदी कायद्यानुसार, शिंदेंना आमदारांचा स्वतंत्र गट स्थापन करायचा असेल दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा हवा आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आपल्यासोबत आहेत, असा दावा केला आहे.

महाविकास आघाडी सरकार पडलं तर काय होईल?

मविआ सरकार पडल्यास भाजप शिंदे गटाला सोबत घेऊन नवीन सरकार बनवण्याचा प्रयत्न करू शकतं.

भाजपने असं केल्यास मविआचं काय होईल?

सभागृहामध्ये मविआला एकजूट दाखवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागेल. काँग्रेसमध्येही बंडाचं निशाण फडकू शकतं.

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का?

शिवसेना-भाजप युतीच्या शक्यता खूप कमी आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांसोबत जाण्याची शक्यता तरी धूसर दिसतेय.

मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता किती?

सध्याच्या घडीला मध्यवधी निवडणूक होण्याची कोणतीही शक्यता नाही.

Shiv Sena leader Eknath Shinde reached Guwahati with his MLAs team
एकनाथ शिंदे परत येणार नाहीत? भुजबळांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय?

महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' होणार?

काँग्रेसची सत्ता असलेल्या अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात भाजपने सत्ता आपल्या बाजूने खेचून आणली होती. काँग्रेसकडे पुरेसे आमदार असतानाही भाजपने ऑपरेशन लोटस राबवत आपले सरकार स्थापन केले होते. आता पुन्हा महाराष्ट्रात त्याची प्रचिती येणार का? अशा चर्चा सुरु आहे. 'ऑपरेशन लोटस' (Operation Lotus) म्हणजे स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा नसलेल्या राज्यांमध्ये सत्ता मिळवण्याच्या भाजपची कथित रणनीती आहे.

या सगळ्या चर्चांना एकनाथ शिंदे यांच्या एका बंडाने जन्म दिला आहे. २०१४ मध्ये जेव्हा भाजपचे १२२ आमदार निवडून आले होते त्यावेळी सुरूवातीला शिवसेनेने विरोधात बसण्याची भूमिका घेतली होती. मात्र आपण भाजपसोबत गेलं पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. तसंच सत्ता आल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातले संबंध हे सौहार्दाचे राहिले आहेत.

२०१९ ला जेव्हा महाविकास आघाडीचा पर्याय समोर आला तेव्हा आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत न जाता भाजपसोबत गेलं पाहिजे त्यासाठी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हट्ट सोडला पाहिजे अशीही भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यामुळे अडीच वर्षे अस्वस्थता सहन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. ते परत येतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला असला तरीही ज्या पद्धतीने ते बाहेर पडले त्यावरून तरी ते परत येतील असं दिसत नाही.

Shiv Sena leader Eknath Shinde reached Guwahati with his MLAs team
Shiv Sena leader Eknath Shinde reached Guwahati with his MLAs team

राज्यसभेच्या वेळी १० मतं फुटली, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी २१ मतं फुटली. ही सगळी मतं महाविकास आघाडीची होती. शिवसेनेच्या उमेदवारांना २६ मतं पडली. शिवसेनेची मतं फुटली आहेत. एकनाथ शिंदे हे यामागे आहेत हे शिवसेनेला कळलं मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. एकनाथ शिंदे यांचं बंड हे पूर्णपणे तयारीनिशी करण्यात आलं यात काही शंकाच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधलं अजित पवारांचं बंड चार दिवसात शमलं होतं. मात्र शिवसेनेला खिंडार पडलं हेच मुळात त्यांना उशीरा लक्षात आलं. महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या दिशेनेच हे पाऊल एकनाथ शिंदे यांनी टाकलं आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ३७ आमदार असा एक गट तयार असेल तर महाविकास आघाडीचं सरकार पडणार यात शंका नाही. सध्या ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आता चार जण कोण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे हे एवढ्या आमदारांचा गट घेऊन बाहेर पडणारे पहिलेच नेते असतील यात शंका नाही.

मंगळवारी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. सुरत हे महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाचं केंद्र आहे. महाविकास आघाडी सरकारचं काय होणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तसंच या प्रकरणात किती ट्विस्ट आणि टर्न्स येतात हे देखील पाहावं लागेल. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बदल झाले आहेत. पुढे काय काय घडणार? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in