Supriya Sule: "मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खूप काळजी वाटते, देवेंद्र फडणवीस..."

सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत
I am Very Much Worried about Maharashtra Cm Eknath Shinde Says Supriya Sule
I am Very Much Worried about Maharashtra Cm Eknath Shinde Says Supriya Sule

मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूप काळजी वाटते. मला वाटतं त्यांच्यामागे खूप मोठं षडयंत्र सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना मुद्दाम प्रॉम्प्टिंग करणं, त्यांना चिठ्ठी पाठवणं यातून त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पुणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिला बचत गटातील महिलांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा महिला बचत गटाच्या कार्यक्रमात सहभाग होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांची काळजी वाटते असं म्हणत देवेंद्र फडणवीस हे त्यांना कमी दाखवत आहेत असा आरोप केला आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्या चिठ्ठीवर बोलल्या...

सुप्रिया सुळे म्हणाल्या की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात घडलेला प्रकार लक्षात घेण्यासारखा आहे. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी दिली. ही बाब सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री काही वेळ थांबले आणि चिठ्ठी वाचून बोलू लागले. यावरून चर्चा या रंगल्या आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून बोलतात का? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

'एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची खूपच काळजी वाटते.'

मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खूपच काळजी वाटते. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामागे काहीतरी षडयंत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे सातत्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान करत आहेत. एखादा नेता जेव्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसतो तेव्हा त्याला चिठ्ठी देणं, मागून प्रॉम्प्टिंग करणं हे सगळं किती योग्य आहे? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला.

राज्यात स्थापन झालेलं नवं सरकार प्रचंड गोंधळलेल्या मनस्थितीत आहे असंही दिसतंय. मुख्यमंत्र्यांचा सातत्याने अपमान केला जात असल्याचं वृत्तवाहिन्यांवरही दिसतंय. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे तो महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं ही टीका करत अनेक आमदारांनी बंड केलं. आता त्या आमदारांचा स्वाभिमान कुठे गेला ? हा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. सातत्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान होतो आहे, हे सातत्याने टीव्हीवरही दिसतंय तरीही या आमदारांना वेदना कशा होत नाहीत असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी पुण्यात विचारला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in