BMC निकालानंतर शिवसेना-मनसेबाबत 'वेगळीच' चर्चा, उद्धव ठाकरेंनी संपवला एक मिनिटात विषय!
Uddhav Thackeray on Manase : मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेने एकत्रित लढवलेल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने समाधानकारक कामगिरी केली असली तरी मनसेला मात्र अपेक्षेइतके यश मिळाले नाही. शिवसेना UBT पक्षाला 65 तर मनसेला फक्त 6 जागांवरच विजय मिळवता आला. यामुळे मनसेची ठाकरे गटाला साथ मिळाली, पण ठाकरे गटाची मनसेला साथ मिळाली का?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
BMC निकालानंतर शिवसेना-मनसेबाबत 'वेगळीच' चर्चा
उद्धव ठाकरेंनी संपवला एक मिनिटात विषय
देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देणार का?
Uddhav Thackeray on Manase : मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेने एकत्रित लढवलेल्या या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने समाधानकारक कामगिरी केली असली तरी मनसेला मात्र अपेक्षेइतके यश मिळाले नाही. शिवसेना UBT पक्षाला 65 तर मनसेला फक्त 6 जागांवरच विजय मिळवता आला. यामुळे मनसेची ठाकरे गटाला साथ मिळाली, पण ठाकरे गटाची मनसेला साथ मिळाली का? अशी चर्चा सुरु आहे आणि विश्लेषण देखील केले जात आहे. याबाबत आता शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेच्या विजयी उमेदवारांना 74946 एकूण मतं, टक्केवारीसह अधिकृत माहिती
शिवसेना-मनसे असा भेदभाव नाही
मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे गटाची मनसेला खरंच मदत झाली का याविषयी उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'मनसेची आम्हाला मदत झाली आणि आमची मनसेला मदत झाली असं काही नाही. शिवसेना भवनचा वॉर्ड आम्ही मनसेला दिला होता. याठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही ही निवडणूक एकदिलाने लढवली. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही एकवाक्यता होती. मी, आदित्य आणि आम्ही सगळे फिरलो त्या सर्व ठिकाणी शिवसेना आणि मनसे असा भेदभाव आम्हाला दिसला नाही. आम्ही एकदिलाने लढलो आहोत.'
पुढील निवडणुकांमध्ये मनसेसोबत राहणार का?
मनपा पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पुढील निवडणुका एकत्रित लढणार का याविषयी देखील ठाकरेंनी भाष्य केले. 'मी राज ठाकरेंशी बोलेन आणि एकत्र राहायला काय हरकत आहे?' असंही ते म्हणाले. 'तसंच आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी' याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी संयुक्त पत्रकार परिषदेची गरज नसल्याचंही ते म्हणाले. शिवसेनेच्या विभाजनाच्या बसलेल्या फटक्याविषयी बोलताना ते म्हणाले की, 'आमचे 54 जण फोडले होते तरीही आमचे 65 नगरसेवक निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. शिवसेना एक असती तर भाजपने आकाशपाताळ एक करुनही त्यांना महानगरपालिकेत यश मिळालं नसतं.'










