राज ठाकरेंची मनसे आणि भाजप यांची युती शक्य आहे? समीकरण जुळल्यास कुणाचा कसा फायदा?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भेट घेतली. तसंच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातही एक बैठक पार पडल्याची बातमी समोर आली. त्यानंतर आता या चर्चा सुरू झाल्या आहेत की भाजप आणि मनसेची युती खरंच शक्य आहे का? तसंच हे झाल्यास मनसेला किती फायदा होईल किंवा भाजपला किती […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भेट घेतली. तसंच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातही एक बैठक पार पडल्याची बातमी समोर आली. त्यानंतर आता या चर्चा सुरू झाल्या आहेत की भाजप आणि मनसेची युती खरंच शक्य आहे का? तसंच हे झाल्यास मनसेला किती फायदा होईल किंवा भाजपला किती फायदा होईल या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
मनसे आणि भाजप यांची युती झाली तर भाजपचा फायदा काय?
मुंबईत शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. ठाकरे आणि मुंबई हे समीकरण खूप जुनं आहे. ते सहजासहजी मोडायचं असेल तर आणखी एक ठाकरेच पर्याय म्हणून दिले तर भाजपला त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि मनसेची युती झाली तर शिवसेनेची आत्ताची जी अवस्था आहे त्यामुळे जी स्पेस मोकळी झाली आहे ती स्पेस भरून काढण्याचं काम आणि चांगला पर्याय देण्याचं काम राज ठाकरे करू शकतात. तसंच ठाकरे आडनाव असल्याने आणि बाळासाहेब ठाकरे यांची छबी राज ठाकरेंमध्ये दिसत असल्याने त्यांच्या भूमिकांचा प्रभाव हा मतदारांवर पडू शकतो. अशात मुंबईत मोठी मजल मारायची असेल तर भाजप आणि मनसे युती हे चांगलं समीकरण असू शकतं.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा राज ठाकरे पुढे नेत आहेत हे दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी परवाच एका कार्यक्रमात जाहीर केलं. मला चिन्हाची गरज नाही. धनुष्यबाणाची गरज नाही. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मी पुढे नेतो आहे मी विचारांनी श्रीमंत आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना आपण पर्याय म्हणून निश्चितपणे निवडले जाऊ शकतो हेच सांगायचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आहे.