
विधान परिषदेच्या एका निवडणुकीनं महाराष्ट्राचं राजकारण उलटंपालटं करून सोडलं. ३६० अंशाच्या कोनात फिरवलं. आता सहा महिन्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे सूप वाजलेत. पाच जागांसाठी ही निवडणूक होतेय. ही निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्याचं कारण काय आणि महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे ठाकरेंचे हात रिकामेच राहणार का, हेच समजून घ्या...
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झालीये. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होतेय. नाशिक आणि अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक आहे. म्हणजेच सत्तांतर घडवून आणणाऱ्या निवडणुकीत आमदारांनी आमदार निवडून दिला. तर या निवडणुकीत तुम्हाला नावावरूनच लक्षात आलं असेल की, शिक्षक आणि पदवीधर हे आमदार निवडून देणार आहेत.
विधान परिषदेच्या 5 सदस्यांची मुदत 7 फेब्रुवारीला संपणार आहे. यासाठी 12 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 30 जानेवारीला मतदान आणि 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
पाच जागांमध्ये राष्ट्रवादी 1, भाजप 1, काँग्रेस 1, शेकाप 1 आणि 1 जागा अपक्षांकडे आहे. शेकापची जागा काँग्रेस, राष्ट्रवादी पुरस्कृत तर 1 अपक्ष भाजप पुरस्कृत आहे. यामध्ये नाशिकमधून काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावतीमधून भाजपचे रणजीत पाटील, औरंगाबादमधून राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकणातून शेकापचे बाळाराम पाटील आणि नागपूरमधून नागो गाणार हे 2017 मध्ये विजयी झाले होते. दर सहा वर्षांनी विधान परिषदेचे आमदार निवृत्ती होतात. आणि त्याच नियमानुसार ही निवडणूक होतेय.
गेल्या वेळची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत जमीन आसमानचा फरक आहे. शिवसेनेत उभी फूट पडलीये. तर एक गट सत्ताधारी भाजपसोबत, तर दुसरा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आहे. त्यामुळे फाटाफुटीनंतर या दोन गटांच्या पदरात त्यांचे मित्रपक्ष किती जागा देतात हे महत्त्वाचं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना आमदाराचं निधन झाल्यानं महाविकास आघाडीने ती जागा ठाकरे गटासाठी सोडली. तर शिंदे गटानं निवडणूकच लढवली नाही. भाजपने उमेदवार दिला. त्यामुळे या निवडणुकीतही शिंदे गट भाजपसाठी सर्व पाच जागा सोडून देणार की काही वेगळी भूमिका घेणार हे बघावं लागेल.
अजूनपर्यंत शिंदे गट आणि भाजपचं जागा वाटपाचं सूत्र समोर आलेलं नाही. पण महाविकास आघाडीचा फॉर्म्यूला समोर आलाय. यामध्ये विद्यमान आमदार ज्या पक्षाचे, त्यांना जागा सोडण्याचं सूत्र ठरवण्यात आलंय. या सूत्रानुसार, नाशिक काँग्रेसला, औरंगाबाद राष्ट्रवादीला आणि कोकणची जागा शेकापला सोडण्यात आलीय. स्वतः अजित पवारांनीच याबद्दल माहिती दिलीये.
ठाकरे गटानं अमरावती आणि नागपूरपैकी एखादी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. पण दोन्ही जागांवर काँग्रेसनंही दावा ठोकलाय. त्यामुळे सर्वांनी अर्ज भरायचे आणि अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शेवटच्या क्षणी जागा कुणाची हे ठरवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलाय. पण सद्यस्थितीत महाविकास आघाडीमध्ये दोन्ही जागांवर काँग्रेसचं पारडं जड आहे.
नागपूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीनंही आग्रह धरलाय. त्यामुळे पाचपैकी एकही आमदार नसलेल्या ठाकरे गटाचे हात रिकामेच राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटासारखंच भाजपसोबत शिंदेंचेही हात रिकामे राहतील का? याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.