जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर; वर्तकनगर पोलीस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

कलम 7 वर आव्हाडांच्या वकीलांचा आक्षेप
jitendra awhad
jitendra awhadFacebook

ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 15 हजारांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी-शर्तींसह त्यांना हा जामीन देण्यात आला आहे. बाँड पेपरवर सही करण्यासाठी आव्हाड यांना न्यायालयात हजर केले जाणार असून, सही केल्यानंतर त्यांची सुटका होणार आहे. याशिवाय इतर ११ जणांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आज सकाळी आव्हाड यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या वकीलांमार्फत जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. आव्हाड यांच्यावर कलम 7 लावण्यात आलं आहे. पण ठाणे जिल्ह्यात हे कलम लावलं जात नाही. तरीही हे कलम लावण्यात आलं. त्यामुळे ही कारवाई हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा युक्तिवाद करत त्यांना जामीन देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या वकीलांमार्फत करण्यात आली होती.

सोमवारी (7 नोव्हेंबर) रात्री वादग्रस्त हर - हर महादेव चित्रपटाचा निषेध म्हणून आव्हाड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता. यावेळी परिक्षीत दुर्वे नामक प्रेक्षकाला मारहाण झाली होती. याच प्रेक्षकांच्या तक्रारीवरुन आव्हाड यांच्यासह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर (काल) शुक्रवारी दुपारी आव्हाड यांना अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर काल आव्हाड यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना पुन्हा कोठडीत नेण्यात आले होते. आज सकाळी त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आव्हाड यांच्या विरोधात लावण्यात आलेली 11 कलमं चुकीची आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यात कलम 7 लावलं जात नाही. तरीही हे कलम लावण्यात आलं, त्यांच्या वकीलांच्या मार्फत युक्तिवाद करण्यात आला. अखेरीस न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in