
Satyajeet tambe suspended from congress
मुंबई : काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या एकत्रित पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. यापूर्वी सत्यजीत तांबे यांचे वडील आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाही काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं आहे. (satyajeet tambe suspended from congress nana patole announce)
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, जगातील सगळ्यात मोठा पक्ष असल्याचा गवगवा करणाऱ्या भाजपकडे नाशिक मतदारसंघात स्वत:चा उमेदवार मिळालेला नाही. सध्या पाचही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असं सगळीकडे वातावरण आहे.'
सत्यजीत तांबे यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई केली जाईल. ते अपक्ष उमेदवार आहेत, त्यांनी आता कोणाचा पाठिंबा मागायचा आणि कोणाचा नाही हे त्यांनी ठरवावं. नाशिक विभाग काँग्रेस विचारांचा आहे. आतापर्यंत तीन टर्म इथून सातत्याने सुधीर तांबे काँग्रेस विचारधारेने निवडून आलेले होते. त्यामुळे तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वासही यावेळी पटोले यांनी व्यक्त केला.
राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी नाशिक मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला होता. काँग्रेसनं इथून पुन्हा एकदा सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या नावाची घोषणा करण्याबरोबरच एबी फॉर्मही देण्यात आला होता. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या नेत्यांची तारांबळ उडाली. तसंच काँग्रेसमधील विसंवादही चव्हाट्यावर आला होता. त्याचवेळी सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. तसंच मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असला तरी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी सांगितलं,
मात्र भाजपचाही पाठिंबा घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. या प्रकरणानंतर भाजपचा पाठिंबा घेणं हा काँग्रेसशी दगाफटका आहे. सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रसेने घेतली. यानंतर काँग्रेसनं सुधीर तांबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. त्यानंतर आता सत्यजीत तांबेंवरही कारवाई करण्यात आली आहे.