शरद पवार आणि बृजभूषण सिंहांचा फोटो, मनसे म्हणते सुज्ञास अधिक सांगण न लगे!

शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे काही फोटो शेअर करुन मनसेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
sharad pawar brij bhushan singh photo tweets by mns trap ayodhya tour ncp bjp
sharad pawar brij bhushan singh photo tweets by mns trap ayodhya tour ncp bjp(फाइल फोटो, सौजन्य: Twitter)

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला होता. ज्यानंतर राज ठाकरेंनी हा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याचबाबत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत असं म्हटलं होतं की, माझ्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. असं असताना आता मनसेकडून आज एक नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये बृजभूषण सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. हाच फोटो शेअर करुन मनसेने पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी या फोटो ट्विट केला असून यावेळी कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, "ब्रिज" चे निर्माते ... सुज्ञास अधिक सांगणे न लगे ... (फोटो झूम करून पाहावा...) त्यामुळे राज ठाकरे यांनी जो आरोप केला होता की, महाराष्ट्रतून रसद पुरविली गेली त्याविषयी आता थेट शरद पवारांवर मनसेकडून आरोप केला जात आहे.

पाहा नेमकं काय म्हणाले गजानन काळे

आज फोटो समोर आल्याने या सगळ्या कथानकामागचा निर्माता कोण हे महाराष्ट्राला आणि देशाला समजलं आहे. महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा राजसाहेबांनी आरोप केलेला होता. त्यांच्या या वक्तव्याला फोटोतून पुष्टी मिळाल्यासारखं आहे. हा महाराष्ट्रात चुकीचा पायंडा पडतोय. अयोध्या दौरा हा कोणताही राजकीय दौरा नव्हता. दक्षिणेत एखाद्या नेत्यांला असा विरोध केला गेला असता तर सर्व राजकीय पक्ष आणि नेते एकत्र आले असते. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात हे दिसत नाही. मनसेच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात हा राजसाहेबांनी आरोप केलेला आहे. आजच्या फोटोतून हा आरोप सिद्ध होतो. असा दावा गजानन काळेंनी केला आहे.

पवार साहेबांवर लोकांचा लवकर संशय येतो: दरेकर

दरम्यान, भाजप नेते प्रविण दरेकर यांनी मनसे नेत्यांनी पवारांवर जो संशय व्यक्त केला आहे तो योग्य असल्याचं म्हटलं आहे.

'बृजभूषण सिंह यांना राष्ट्रवादीकडून रसद पुरवली जाते असे माझे स्पष्ट स्पष्ट मत आहे. कारण तसे संदर्भ दिसत आहेत. भाजपच्या भूमिकेला बळकटी देणारी राज ठाकरे यांची भूमिका असल्याने आमचे त्यांना समर्थन होते. आजही आहे आणि उद्याही राहील. पवार साहेब यांचे कुस्तीगीर संघटनेचे संबंध आहेत. तसेच बृजभूषण हे देखील या संघटनेत आहेत. तर मध्येच रोहित पवार ही तिकडे दर्शनाला गेले होते. असे सगळे संदर्भ आणि आणि घडामोडी पाहता पवार साहेबांवर लोकांचा लवकर संशय येतो.'

'तसेच राज ठाकरेंबाबतची भूमिका ही बृजभूषण यांची वैयक्तिक खासदार म्हणून घेतलेली भूमिका होती. ती काही भाजपची अधिकृत भूमिका नव्हती. यामागे काय सापळा आहे ते योग्य वेळी समोर येईल.' असं प्रविण दरेकर यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in