हिंदुस्थानाला तीन बाधा..म्लेंच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा- संभाजी भिडे गुरुजींच विधान

विषबाधा, भूतबाधेवर उपाय सापडेल पण....सांगलीतील कार्यक्रमात केलं वादग्रस्त वक्तव्य
हिंदुस्थानाला तीन बाधा..म्लेंच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा- संभाजी भिडे गुरुजींच विधान

आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. सांगली येथे एका कार्यक्रमात बोलत असताना भिडे गुरुजींनी भारताला म्लेंच्छ (मुसलमान) बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा अशा तीन बाधा झाल्याचं म्हटलं आहे. मिरज येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरण कार्यक्रमात भिडे गुरुजी बोलत होते.

"व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते, समाजात काही कार्यक्रमात खाण्या-पिण्यात कमी-अधिक काही झालं तर त्यामुळे विषबाधा होते. विषबाधा, भूतबाधा यावर उपाय आहेत. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत..त्या आहेत म्लेंच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा आणि या तिन्ही बाधांवरचा तोडगा आहेत शिव छत्रपती आणि संभाजी महाराज."

या कार्यक्रमात पुढे बोलत असताना भिडे गुरुजींनी आपण आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची उपासना केली पाहिजे असं सांगितलं. उपासना करायची म्हणजे त्यांना प्रिय असणाऱ्या सर्व काही गोष्टी पूर्ण कशा करता येतील असा आपला दिनक्रम असला पाहिजे असं भिडे गुरुजी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "सबंध जगाचा त्राता म्हणून हिंदुस्थानला ताकद मिळाली पाहिजे. ती मिळायची असेल, तर एकच उपाय आहे. सबंध हिंदुस्थानचा रक्तगट बदलायला हवा. 123 कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी-संभाजीच करायला हवा. तो करण्याचा उद्योग शिवछत्रपतींच्या जीवनाच्या उपासनेतून होऊ शकतो. राष्ट्रोद्धार, राष्ट्रउन्नती हिंदुंच्या रक्तात उत्पन्न करण्यासाठी माझा जन्म आहे असं भगवंताला रोज सकाळी आपण म्हटलं पाहिजे".

शिवाजी महाराजांना काय प्रिय होतं? मरणाच्या वेळीदेखील हा महापुरुष आपले कुटुंब, लेकीबाळी, सुना-नातवंड यांचा विचार करत नव्हता. 3 एप्रिल 1680 रोजी दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी शिवछत्रपतींनी देहत्याग केला. त्यापूर्वी आपल्या भोवतीच्या माणसांना ते म्हणाले, "आम्ही जातो, आमचा इथला मुक्काम संपला. सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा." सप्तसिंधू म्हणजे काय? हिमालयात उगम पावणाऱ्या गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी अशा सात नद्या", असंही संभाजी भिडे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in