'अण्णा हजारेंच्या आंदोलनामागे RSS आणि मोदी', पाहा सोनिया गांधींच्या दाव्यावर अण्णांचं काय म्हणणं...
सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामागे RSS आणि नरेंद्र मोदी यांची भूमिका असल्याचा उल्लेख केल्याने राजकीय चर्चा सुरू झाली आहे. यावर आता अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

अहिल्यानगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि नरेंद्र मोदी यांची भूमिका असल्याचा उल्लेख काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या आरोपांवर अण्णा हजारेंनी थेट राजकीय प्रतिक्रिया देण्याचे टाळत सूचक शब्दांत आपली भूमिका मांडली आहे.
सोनिया गांधींच्या पुस्तकातील उल्लेखामुळे नवा वाद
सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीत झालेल्या आंदोलनाचा संदर्भ दिला आहे. या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचे त्यांनी नमूद केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे तत्कालीन भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आणि त्यामागील राजकीय शक्ती यावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंना सोनिया गांधी यांच्या विधानाबाबत विचारण्यात आले.
हे ही वाचा>> '... अश्रू तरळले!', पवारांविषयी सोनिया गांधींनी पुस्तकात काय लिहिलंय?
'कोण काय म्हणतं यापेक्षा समाज काय म्हणतो ते महत्त्वाचं'
यावर उत्तर देताना अण्णा हजारे यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये सहभागी होण्यास नकार दिला. ते म्हणाले, "कोण काय म्हणतं यापेक्षा समाज काय म्हणतो, हे महत्त्वाचे आहे. कोण काय म्हणतंय, हा राजकीय पक्ष-पार्ट्यांचा भाग आहे. आपण पक्ष-पार्ट्यांचा विचार करत नाही. आम्ही कोणत्याही पक्षाकडे किंवा पार्टीकडे गेलेलो नाही."
'निंदा करो वा वंदन करो, आपण काम करत राहायचं'
अण्णा हजारेंनी यावेळी आपल्या कामाची दिशा स्पष्ट करताना समाज आणि देशहितालाच प्राधान्य असल्याचे सांगितले. "समाज आणि देश यांच्यासाठी जे-जे काम असेल, ते निरंतर करत राहणे हेच आपले ध्येय आहे. कोणी माझी निंदा करो वा वंदन करो, त्याची आपण चिंता करायची नाही. आपण फक्त आपले काम करत राहायचे," असे ते म्हणाले.
हे ही वाचा>> 5 मिनिटांत बंटी पाटलांकडून सारे हिशोब चुकते! चंद्रकांत पाटलांना थेट चॅलेंज
'ज्या रंगाचा चष्मा लावावा, त्याच रंगाचे जग दिसते'
यावेळी अण्णा हजारेंनी लोकांच्या दृष्टिकोनावरही मार्मिक भाष्य केले. "ज्या रंगाचा चष्मा लावावा, त्याच रंगाचे जग दिसते," असे ते म्हणाले. प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारसरणी आणि दृष्टिकोनातून एखाद्या घटनेकडे पाहत असते, असा त्यांचा या विधानातून सूचक संदेश होता.
एकूणच, सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील उल्लेखामुळे अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाच्या राजकीय पार्श्वभूमीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, या वादात थेट भूमिका घेण्याऐवजी अण्णा हजारेंनी समाज आणि देशासाठी काम करत राहण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
