‘त्याच्यावर 307 कलम लावून टाका’, उपमुख्यमंत्री शिंदे कोणावर संतापले? VIDEO
deputy cm eknath shinde : रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीला जाब विचारण्यात आल्याने एका वृद्धाला ओला चालकाने बेदम मारहाण केली होती. विशेष म्हणजे पत्नी समोर असताना वृद्धाला मारहाण झाली. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 307 कलमान्वये कारवाईचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
‘त्याच्यावर 307 कलम लावून टाका’
उपमुख्यमंत्री शिंदे कोणावर संतापले?
Deputy CM Eknath Shinde : ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलच्या परिसरात काल सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अत्यंत धक्कादायक घटना घडली. रस्त्यावर थुंकू नका, अशी साधी आणि योग्य सूचना देणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला परप्रांतीय ओला चालकाने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना केवळ मारहाणीपुरती मर्यादित राहिली नाही, तर त्या चालकाने वृद्धाच्या पत्नीसमोरच त्यांना गंभीर जखमी केले. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून, सर्वच स्तरातून या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या मारहाणीत संबंधित वृद्धाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
‘त्याच्यावर 307 कलम लावून टाका’, शिंदेंचे कारवाईचे आदेश
या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना कडक सूचना दिल्या आहेत. संबंधित ओला चालकाने ज्या पद्धतीने हातात दगड घेऊन वृद्धावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ते पाहता ही केवळ मारहाण नसून हत्येचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते. या कारणास्तव, त्या आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या 307 या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
शिवसैनिकांनीही शिकवला धडा
घटनेची माहिती मिळताच स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी तत्काळ सक्रिय होत आरोपीचा शोध घेतला. शिवसेना शिंदे गटाचे नितेश पाटोळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुमित बोराडे या पदाधिकाऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत त्या परप्रांतीय चालकाचा शोध घेतला. त्याला शोधून काढल्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या खास स्टाईलने त्याला अद्दल घडवली आणि त्यानंतर आरोपीला पकडून वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय मतभेद बाजूला ठेवून दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पीडित वृद्ध व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला, ज्यामुळे पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यासाठीचा दबाव वाढला.
वर्तक नगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीने ज्या क्रूरतेने एका वृद्ध नागरिकाला मारहाण केली, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. भर रस्त्यात अशा प्रकारे दादागिरी करून ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता स्थानिक रहिवाशांकडून जोर धरत आहे.









