'अट्टहास सोडा' मुश्रीफांवर सतेज पाटील चिडले, थेट रोखठोक भूमिका

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर सतेज पाटील यांनी महायुती सरकार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. लोकांनी दिलेला कौल नाकारला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

ADVERTISEMENT

Gokul election
Gokul election
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'अट्टहास सोडा' मुश्रीफांवर सतेज पाटील चिडले

point

थेट रोखठोक भूमिका, पाहा काय म्हणाले?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या निवडणुकीनंतर सरकारने काढलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत महायुती सरकार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या आघाडीला बहुमताचा कौल मिळालेला असतानाही महायुतीकडून आडकाठी आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या पेचावर बोलताना सतेज पाटील यांनी विरोधकांनी आपली भूमिका स्वीकारून बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं, असं म्हटलं. हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षाला 12 जागांचा आकडा मिळाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून बैठकीला उपस्थित राहून आपली भूमिका बजावण्याची जबाबदारी त्यांची होती, असं पाटील म्हणाले. विधिमंडळात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सत्ताधारी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहतो. मग गोकुळमध्ये विरोधकांनीही तीच भूमिका घ्यायला हवी होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कौल स्वीकारून विरोधकांनी बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं - सतेज पाटील

गोकुळच्या निवडणुकीच्या बैठकीत कोरमचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, ही सर्वसाधारण कामकाजाची बैठक नव्हती, तर निवडणुकीसाठी बोलावलेली बैठक होती, असं सतेज पाटील यांनी सांगितलं. या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारून मतदानाची प्रक्रिया पूर्ण करायला हवी होती. दोन्ही बाजूंनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास मतदान घेऊन ज्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, त्यांचा अध्यक्ष निवडला जायला हवा होता, अशी त्यांची भूमिका आहे. कोरमचा नियम लागू केला असेल, तरी लोकांनी दिलेला कौल स्वीकारून विरोधकांनी बैठकीला उपस्थित राहायला हवं होतं, असंही ते म्हणाले. या पेचातून मार्ग काढण्यासाठी सरकारने 14 सदस्यांच्या कोरमची अट बाजूला ठेवून साध्या बहुमताच्या आधारे निर्णय घेतला असता, तर लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखला गेला असता, असं पाटील यांनी म्हटलं. सरकारने चार संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन नियुक्त केल्याच्या निर्णयावरही त्यांनी आक्षेप घेतला.

हेही वाचा : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला माणुसकीचा हात; अशोक ठोंबरे यांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा’ वाटप

गोकुळमधील हा पेच कायम राहिला असता, तर प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता होती आणि पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली असती, असं सतेज पाटील यांनी सांगितलं. मात्र, सरकारने काढलेला पर्याय हा लोकांनी दिलेल्या मताचा सन्मान करणारा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सरकारला वाटत असेल की लोक काही दिवसांनी हा विषय विसरतील, पण तसं होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. गेल्या 12 वर्षांतील तरुणांना दिलेली आश्वासनं आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष याचा हा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकांनी मतदानातून दिलेली सत्ता बाजूला काढली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे हा विषय लोकांच्या लक्षात राहील, असं पाटील म्हणाले. गोकुळसारख्या दूध संघासाठी सरकार एवढी ताकद का लावत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोकुळची उलाढाल सुमारे चार हजार कोटींची असून साडेतीन लाख शेतकऱ्यांचा या संघाशी संबंध आहे. त्यामुळे या संस्थेच्या निवडणुकीत सरकारने हस्तक्षेप का केला, याचं उत्तर मिळायला हवं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीत फेक अकाउंट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केल्याचा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. यावर उत्तर देताना सतेज पाटील यांनी हा आरोप फेटाळण्याच्या भूमिकेतून प्रतिक्रिया दिली. निवडणुकीतील पराभवाचं दुःख केवळ एका उमेदवारापुरतं मर्यादित नसून, पराभूत झालेल्या इतर कार्यकर्त्यांचाही विचार व्हायला हवा होता, असं ते म्हणाले. 40 वर्षे सोबत काम केलेल्या युवराज पाटील यांचाही पराभव झाला. त्यांच्या पराभवाबद्दलही हसन मुश्रीफ यांनी बोलायला हवं होतं, अशी टिप्पणी त्यांनी केली. गोकुळच्या निवडणुकीत लोकांनी दिलेल्या मतांचा आदर झाला पाहिजे, हीच आपली भूमिका असल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.