शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का, राज ठाकरेंनी ज्यांचं घेतलेलं भरसभेत नाव त्यांचीच थेट शिवसेनेत एंट्री!
डोंबिवलीमधील भाजप, ठाकरे गट, मनसे आणि इतर पक्षांतील अनेक नेते आणि माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ADVERTISEMENT

डोंबिवली: डोंबिवलीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजप, मनसे आणि आता शिंदेंच्या शिवसेनेत धात्रकांचा प्रवेश!
या सोहळ्यात भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, माजी नगरसेविका मनीषा धात्रक, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी आणि माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटावर विश्वास व्यक्त करत पक्षप्रवेश केला.
हे ही वाचा>> महायुती 6 जागांवर बिनविरोध! तनपुरेंच्या जागेवर मात्र ड्रामा, विधानपरिषदेच्या 17 लढती एका क्लिकवर
काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने त्यांचे विद्यमान नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनिषा धात्रक यांना तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे याच नाराजीतून त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मनसेने धात्रक पती-पत्नीसह त्यांच्या मुलीला देखील नगरसेवक पदाचं तिकीट दिलं होतं. दरम्यान, याच निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत धात्रक कुटुंबीयांचं नाव घेत भाजपवर गंभीर आरोप केले होते. 'निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मनसेत आलेल्या धात्रक कुटुंबीयांना भाजपने 15 कोटींची ऑफर दिली होती.' असा आरोप राज ठाकरेंनी त्यावेळी केला होता.
दरम्यान, आता त्याच धात्रक कुटुंबीयांनी मनसेचेही साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.









