अशोक चव्हाण ते मिलिंद देवरा.., दिग्गजांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंना का रोखलं? Inside स्टोरी
Rahul Bondre : चिखलीचे माजी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र राहुल गांधींच्या फोननंतर त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अशोक चव्हाण ते मिलिंद देवरा.., दिग्गजांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंना का रोखलं? Inside स्टोरी
श्वेता महाले स्थानिक आमदार असतानाही भाजपला बोंद्रे का हवे होते?
Rahul Bondre : बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका कॉलमुळे ऐनवेळी ब्रेक लागलाय. चिखलीचे दोन वेळचे काँग्रेस आमदार राहिलेले राहुल बोंद्रे 22 सप्टेंबरला मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची तयारी सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार होता. भाजपकडूनही यासाठी तयारी करण्यात आली होती. बोंद्रे यांनी स्वतः सोशल मीडियावर भाजपमध्ये जाण्याची माहिती दिली होती. त्यामुळे बुलढाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली होती. मात्र, प्रवेशाच्या आदल्या रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात फोनवरून संवाद झाला. या संवादानंतर बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला.
श्वेता महाले स्थानिक आमदार असतानाही भाजपला बोंद्रे का हवे होते?
मग राहुल गांधींच्या एका फोन कॉलनंतर राहुल बोंद्रे यांनी पक्षांतराचा निर्णय का बदलला? राहुल गांधींनी अशोक चव्हाणांना जाऊ दिलं, मिलिंद देवरा यांनाही रोखलं नाही, मग बोंद्रेंसाठी त्यांनी इतकी प्रतिष्ठा का पणाला लावली? श्वेता महाले स्थानिक आमदार असतानाही भाजपला बोंद्रे का हवे होते? याचीच इनसाइड स्टोरी समजून घेऊया. या सगळ्या व्हायरल व्हिडिओ कॉल स्टोरीची सुरुवात 21 सप्टेंबरच्या रात्री उशिरा झाली. या घडामोडींशी संबंधित काँग्रेस नेत्यांच्या मते, मुंबईतील भाजप कार्यालयात राहुल बोंद्रेंच्या प्रवेशाची जय्यत तयारी सुरू होती. त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत राहुल गांधींशी संपर्क साधला. सपकाळ यांनी संपूर्ण परिस्थिती राहुल गांधींना सांगितली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच राहुल गांधींनी क्षणाचाही विलंब न लावता राहुल बोंद्रेंशी कॉन्फरन्स कॉलवर थेट संवाद साधला. फोनवर राहुल गांधींचं पहिलं वाक्य होतं, “घबराना नहीं है, प्रेशर में मत आओ, गलती मत कर जाना. आप काँग्रेस पार्टी के लॉयल आदमी हो. ये आप पर सायकॉलॉजिकल प्रेशर डाल रहे हैं, क्योंकि ये चाहते हैं कि आप भाग जाओ और यहां कॉम्पिटिशन खत्म हो जाए.” राहुल गांधींनी पुढे सल्ला दिला, “एक बात समझ लो, हार के बिना जीत नहीं होती. हार तो जीत का फाउंडेशन है.”
राहुल गांधींचे हे शब्द ऐकताच राहुल बोंद्रे कॅमेऱ्यासमोरच भावूक झाले. डोळ्यांत अश्रू आणून त्यांनी उत्तर दिलं, “भैया, आपका फोन आया, मेरे लिए यही बहुत बड़ी बात है. आप मेरा सब कुछ चला जाए तो भी चलेगा, लेकिन आपकी इस लड़ाई में आखिरी सांस तक आपके साथ रहूंगा.” कॉल संपला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि चिखलीतलं राजकीय गणित 180 अंशात फिरलं. मुंबईला निघणाऱ्या कार्यकर्त्यांचे जत्थे चिखलीतच थांबले आणि बोंद्रेंनी आपला भाजप प्रवेश रद्द केला.
राहुल बोंद्रे नेमके कोण आहेत?
मग भाजपला हवे असणारे हे राहुल बोंद्रे नेमके कोण आहेत? त्यांचा राजकीय इतिहास काय आहे? राहुल बोंद्रे हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे दोन वेळा आमदार राहिले आहेत. या मतदारसंघातून 2009 आणि 2014 मध्ये ते सलग दोनदा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. म्हणजेच वयाच्या तिशीतच ते आमदार झाले होते. तरुण आमदार म्हणून तेव्हा ते चर्चेतही आले होते. त्याचबरोबर त्यांचं बोंद्रे कुटुंब काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ म्हणून ओळखलं जातं. त्यांचे वडील सिद्धविनायक ऊर्फ तात्यासाहेब बोंद्रे यांचा चिखली परिसरात मोठा प्रभाव राहिला. तात्यासाहेब हे पंढरीनाथ पाटील यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जायचे. पंढरीनाथ पाटील म्हणजे क्रांतिज्योती महात्मा फुलेंचे आद्य चरित्रकार आणि ‘दलित मित्र’ अशी त्यांची ओळख होती. तात्यासाहेब अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य होते. त्यांनी या संस्थेसाठी चिखलीत त्याकाळी जवळपास 15 एकर जमीन दान दिली होती. चिखलीत त्यांच्याकडे मोठी जमीनही आहे. बोंद्रे कुटुंब हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख लिंगायत चेहऱ्यांपैकी एक मानलं जातं. चिखलीत त्यांचं चांगलं राजकीय प्रस्थ आणि कार्यकर्त्यांचं जाळं आहे. याच बळावर राहुल बोंद्रे यांनी दोन वेळा आमदार होण्याची कामगिरी केली. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांचा 6,810 मतांनी, तर 2024 च्या निवडणुकीत अवघ्या 3,201 मतांनी निसटता पराभव झाला. भाजपच्या नवख्या उमेदवार श्वेता महाले यांच्याकडून झालेला हा पराभव बोंद्रेंच्या जिव्हारी लागला होता.
