राहुल गांधींच्या फोनमुळे भाजप प्रवेश थांबवला, पण आता थेट बोंद्रेंच्या संस्थांना नोटीस

Rahul Bondre : चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संस्थांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शिष्यवृत्ती, आर्थिक व्यवहार, कर्मचारी आणि महाविद्यालयाच्या परवानग्यांशी संबंधित कागदपत्रे मागवण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

Rahul Bondre
Rahul Bondre
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राहुल गांधींच्या फोनमुळे भाजप प्रवेश थांबवला

point

पण आता थेट बोंद्रेंच्या संस्थांना नोटीस

Maharashtra Politics, जका खान : बुलढाण्यातील चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या संस्थांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. 1993 पासून संस्थांनी केलेल्या कामकाजाची आणि विविध आर्थिक व्यवहारांची माहिती मागवण्यात आल्याचे बोंद्रे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून सांगितले. या नोटीसमध्ये संस्थांशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी मागितलेली माहिती सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत असल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. दरम्यान, बोंद्रे यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय निधी मिळवल्याचा आणि बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमध्ये चिखली पोलिसांत तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून, राहुल बोंद्रे सध्या जामिनावर आहेत.

हेही वाचा : "डरपोक लोकं, कुठेतरी लपून बसतात..", टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री काय म्हणाले?

पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 94 अंतर्गत ही नोटीस बजावली आहे. चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ही माहिती मागवण्यात आली आहे. या प्रकरणांचा तपास बुलढाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार करत आहेत. नोटीसमध्ये श्री. रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांकडून यापूर्वीही पत्रव्यवहार आणि स्मरणपत्रांद्वारे माहिती मागवण्यात आल्याचे नमूद आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनची माहिती मागवण्यात आली आहे.

हेही वाचा : बारामती विमानतळाजवळ शिपिंग कंपनीच्या मालकावर हल्ला, फुलांचा गुच्छ देण्याच्या बहाण्याने आले अन्...

बोंद्रेना बजावलेल्या नोटीसमध्ये नेमकं काय?

पोलिसांनी महाविद्यालयाला मिळालेल्या शिष्यवृत्ती आणि शुल्कमाफीच्या रकमेचा वर्षनिहाय तपशील मागितला आहे. शासनाकडून मंजूर झालेली आणि प्रत्यक्ष मिळालेली रक्कम, ती जमा झालेल्या बँक खात्यांचा तपशील, विद्यार्थ्यांना करण्यात आलेले वितरण आणि विद्यार्थ्यांना न दिलेली किंवा संस्थेकडे राखून ठेवलेली रक्कम यांची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. याशिवाय महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचे लेखापरीक्षित ताळेबंद, जमा-खर्च पत्रके, रोकड वही आणि खात्यांची नोंद मागवण्यात आली आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे, नियुक्तीचे आदेश, हजेरीपट, वेतनश्रेणी, वेतनाची एकूण रक्कम आणि वेतनासाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांची माहितीही मागवण्यात आली आहे. महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी घेताना सादर केलेली अकृषक प्रमाणपत्रे, बांधकाम प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र आणि अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राहुल बोंद्रे यांनी व्हिडीओ पोस्ट करत दिली प्रतिक्रिया 

या नोटिशीनंतर राहुल बोंद्रे यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून आपली भूमिका मांडली. सरकारच्या विरोधात प्रश्न विचारणाऱ्या पोस्ट केल्यानंतर आपल्यावर आणि सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसमध्ये राहून पक्षाचे काम करत असताना, अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारीही आपल्यावर असल्याचे त्यांनी सांगितले. चिखली विधानसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यातील काही भागांत दौरे करून शाळांना भेटी दिल्यानंतर लगेचच पोलिसांची नोटीस मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. ही कारवाई लोकशाही आणि संविधानाची गळचेपी करणारी असल्याची टीका त्यांनी केली. पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप करतानाच, आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले. पुढेही अशा चौकशांना आणि अडचणींना सामोरे जाण्याची तयारी असल्याचे सांगत, देशाची लोकशाही, घटना आणि संविधानासाठी लढत राहणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली.