'मोदी-शाहांच्या मनात अत्यंत पराकोटीची...', राज ठाकरेंचा प्रचंड संताप अन् जोरदार हल्लाबोल!
राज ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलन आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय राज्यघटनेचा दाखला देत त्यांनी नागरिकांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याच्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही.’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. दिल्लीतील आंदोलकांवर होणारी कारवाई, महिला पत्रकारांनी केलेल्या तक्रारी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या मुद्द्यांवर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत लोकशाहीत स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांना किती महत्त्व आहे, हे अधोरेखित केलं आहे. एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या मनमानीला खतपाणी घालण्यासाठी देशातील स्वातंत्र्याची आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मूल्यं पणाला लावता कामा नयेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘मोदी-शाहांच्या मनात हुकूमशाही’
राज ठाकरे यांनी मोदी आणि शाह यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना देशातील यंत्रणांवर नियंत्रण मिळवून सत्ता राबवली जात असल्याचा आरोप केला आहे. ही सत्ता मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी वापरली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
हे ही वाचा>> CJP Protest: एका बाजूला पोलीस, दुसरीकडे आजींच्या निधनाची बातमी; अभिजीत दिपकेंवर संकट
सत्ताधाऱ्यांच्या धोरणांना विरोध केला किंवा त्यांच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून आंदोलकांना चिरडण्यात येत असेल आणि त्यांना अटक केली जात असेल, तर अशा प्रवृत्तीला विरोध केला पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचा आणि त्याच्या निर्णयांना विरोध करण्याचा अधिकार नागरिकांना असला पाहिजे, असंही त्यांनी अधोरेखित केलं.
