CJP Protest: एका बाजूला पोलीस, दुसरीकडे आजींच्या निधनाची बातमी; अभिजीत दिपकेंवर संकट

मुंबई तक

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्लीमध्ये आंदोलनासाठी गेले असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, हिंगोलीतील संतुक पिंपरी येथे त्यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचं दीर्घ आजाराने निधन झालं असून, त्यांच्या आईने पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

abhijeet dipke delhi police custody grandmother savitribai dies hingoli
अभिजीत दिपके
Google CTA

हिंगोली: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके  (Abhijeet Dipke) यांना दिल्लीत आंदोलनासाठी जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अभिजीत सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दिपकेंच्या आजी सावित्रीबाई शंकर दिपके यांचं आज (शनिवारी, 10 ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झालं. त्या सुमारे 80 वर्षांच्या होत्या. हिंगोली जिल्ह्यातील संतुक-पिंपरी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एका बाजूला अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी आहे, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. या दुहेरी संकटामुळे दिपके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिंगोलीतील मूळ गावी सावित्रीबाईंनी घेतला अखेरचा श्वास

अभिजीत दिपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. हिंगोली जिल्ह्यातील संतुक-पिंपरी हे त्यांचं पैतृक गाव आहे. त्यांचे आजी-आजोबा याच गावात राहत होते. सावित्रीबाई शंकर दिपके यांची प्रकृती गेल्या काही काळापासून ठीक नव्हत्या. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

हे ही वाचा>> 'बाळा, हे सरकार विचित्र आहे...' दिपकेंच्या आईला अश्रू अनावर, तर वडिलांचा संताप, काय म्हणाले?

सावित्रीबाईंच्या निधनाची बातमी समजल्यानंतर दिपके कुटुंबीय आणि संतुक-पिंपरी गावात शोकाचं वातावरण निर्माण झालं आहे. अभिजीत यांचे आई-वडील छत्रपती संभाजीनगरमधील 'शंकर सदन' या निवासस्थानातून संतुक-पिंपरीकडे रवाना होण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.