Maharashtra Politics: पक्ष आणि चिन्ह जाणं पवारांना नवं नाही... पाहा त्याचाच A टू Z इतिहास!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

शरद पवारांचा पक्ष आणि चिन्हाबाबतचा इतिहास
Sharad Pawar
social share
google news

Sharad Pawar Party History: मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाकडे अधिकृतपणे सोपवलं आहे. अशावेळी शरद पवार यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असं असलं तरीही पक्ष किंवा चिन्ह जाणं हे काही नवं नाही. कारण शरद पवार यांनी आतापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या चिन्हांवर आणि पक्षांच्या नावावर निवडणुका लढवल्या आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकीर्दीत ते बरेच यशस्वी देखील राहिले आहेत. हाच सगळा त्यांचा इतिहास आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (sharad pawar has lost ncp party and symbol but these things are not new to him know his history related congress party and symbol)

शरद पवारांचा पक्ष, चिन्ह आणि निवडणुकीचा इतिहास...

साधारण 1960 साली शरद पवार हे स्थानिक पातळीवरील राजकारणात सक्रीय झाले होते. महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचं काम करताना एका कार्यक्रमात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना आमंत्रित केलेलं. त्यावेळी शरद पवारांच्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण हे प्रभावित झालेले. त्यानंतर यशवंतरावाच्या मार्गदर्शनानुसार शरद पवार यांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

1967 च्या त्यांना काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं होतं. ज्यामध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून विजयी मिळवला होता. तेव्हापासून शरद पवार हे पक्के काँग्रेसी नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित होते. मात्र, मधल्या काळात अनेक राजकीय स्थितंतरं घडली. ज्यामध्ये इंदिरा गांधी या राजकारणात आल्यावर काँग्रेसचं विभाजन झालं. पण त्यानंतर पक्ष आणि देशाच्या पातळीवर इंदिरा गांधींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं. तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. 1977 साली इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवून देशात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या. ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आणि देशात जनता पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं.

हे ही वाचा>> NCP: शरद पवारांना मोठा राजकीय धक्का! पक्ष अजितदादांकडेच

याच्या वर्षभरानंतरच म्हणजे 1978 साली शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले.
 
18 जुलै 1978 रोजी शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. यावेळी पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस (समाजवादी) पक्ष आणि जनता पक्ष यांची पुरोगामी लोकशाही दल ही आघाडी तयार केली.
 
पण 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. ज्यामध्ये शरद पवारांचे सरकारही बरखास्त झाले. पण तरीही काँग्रेसमध्ये न जाता त्यांच्याविरोधात राज्यात लढा द्यायचा यावर पवार ठाम होतं.

ADVERTISEMENT

दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशाचं पंतप्रधान पद आणि काँग्रेस पक्षाची धुरा ही राजीव गांधी यांच्याकडे आली. त्यावेळी राजीव गांधी यांनी शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं प्रयत्न केले. राजीव गांधींच्या शब्दाला मान देत शरद पवार यांनी देखील 1987 साली म्हणजे ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा  काँग्रेस (I) पक्षात पुन्हा प्रवेश केला. 

ADVERTISEMENT

जून 1988 साली पंतप्रधान राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची निवड केली. 

पण 1989 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. त्यानंतर जे सरकार अस्तित्वात आलं त्याची धुरा ही नरसिंहरावांकडे आली. याचवेळी पंतप्रधान म्हणून शरद पवार यांचं देखील नाव चर्चेत होतं. मात्र, नरसिंहरावांनी त्यावेळी बाजी मारली होती. पण यावेळी शरद पवारांना तेवढ्या तोलामोलाचं असं संरक्षण मंत्रिपद देण्यात आलं होतं. 

हे ही वाचा>> NCP: 'आयोगाचा निकाल..', अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

तर दुसरीकडे महाराष्ट्रात सुधाकरराव नाईकांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, मुंबईतील जातीय दंगलींनंतर सुधाकरराव यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पंतप्रधान नरसिंह रावांनी शरद पवारांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून नेमलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना

1989 ते 1999 शरद पवार हे काँग्रेस (I) मध्येच होते. पण 1999 साली पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांच्यासह शरद पवारांनी अशी मागणी केली की, '13 व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींऐवजी भारतात जन्मलेल्या कोणाही नेत्याला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे.' पण त्यांच्या याच मागणीनंतर काँग्रेस पक्षाने शरद पवार, पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केलं.
  
त्यानंतर 10 जून 1999 रोजी शरद पवारांनी त्यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची' स्थापना केली. याच पक्षाच्या जोरावर शरद पवार यांनी 2023 पर्यंत आपलं राजकारण सुरू ठेवलं. 

मात्र, जुलै 2023 रोजी शरद पवारांचे पुतणे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे बंड केलं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगात धाव घेतली गेली. अखेर आज (6 फेब्रुवारी) त्यावर निकाल देण्यात आला. ज्यामध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांचं असल्याचं मान्य केलं. 

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांना नवा पक्ष आणि नवं चिन्ह घेऊन महाराष्ट्रातील जनतेसमोर जावं लागणार आहे. या वयात ही लढाई पवारांसाठी नक्कीच सोप्पी नाही.. पण तरीही लढवय्या नेता अशी ओळख असलेला पवारांचा करिष्मा महाराष्ट्राच्या जनमानसावर काय जादू करू शकतो हे अवघ्या महाराष्ट्राने 2019 विधानसभा निवडणुकीत पाहिलं आहे. त्यामुळे आजच्या निकालानंतर शरद पवार हे पुन्हा नव्या उमेदीने जनतेत जातील एवढं मात्र नक्की... 
  
  

    follow whatsapp

    ADVERTISEMENT