'मी फक्त आशिष शेलारांना ओळखते, बाकी कुणालाही...' ठाकरे बंधूंबाबत आशा भोसलेंचं भुवया उंचावणारं विधान!
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू असताना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मात्र, याबाबत एक वेगळंच विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच हिंदी भाषा सक्तीविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने आता यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता गायिका आशा भोसले यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य करताना एक वेगळेच वक्तव्य केले आहे. त्यामुळ सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आशा भोसले म्हणाल्या की, "मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत. बाकी कुठलेही लोकं मला माहिती नाहीत. म्हणजे राजकारणामध्ये.. राजकारणात माझा काहीही संबंध नाही. मला राजकारण हे नकोच आहे." असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान केले, ज्यामध्ये त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत विचारणा करण्यात आली होती.
हे ही वाचा>> "ठाकरे ब्रँड इज ब्रँड..." राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ट्विट करत...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पूर्वी शिवसेनेत एकत्र काम केलेलं. मात्र, राजकीय मतभेदांमुळे दोघे वेगळे झाले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले, तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षात पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, विशेषत: महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमुळे. या चर्चांमध्ये दोघांचे भावनिक नाते आणि राजकीय हितसंबंध यांचा समावेश आहे.
हे ही वाचा>> हिंदी भाषा सक्ती: राज ठाकरेंची मोठी घोषणा, आषाढीच्या मुहूर्तावर मुंबईतून फुंकणार रणशिंग!
आशा भोसले यांचं वक्तव्य
आशा भोसले यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, त्या राजकारणात फक्त भाजपचे नेते आशिष शेलार यांना ओळखतात. त्यांनी ठाकरे बंधूंबाबत कोणतेही मत न देता आपली भूमिका स्पष्ट केली. पण त्यांचं हेच वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे, कारण आशा भोसले यांचे ठाकरे कुटुंबीयांशी खूप जुने आणि कौटुंबिक संबंध आहेत. अशावेळी आशा भोसलेंनी ज्या पद्धतीने या विषयावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे त्यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आशिष शेलार यांचा उल्लेख, पण ठाकरेंचं नाव घेणं टाळलं
आशिष शेलार हे भाजपचे मंत्री आहेत आणि त्यांचे नाव आशा भोसले यांच्या वक्तव्यामध्ये आले आहे. शेलार यांच्याशी आशा भोसले यांचे जवळचे नाते असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांचा उल्लेख करताना आशा भोसले यांनी राजकारणापासून दूर राहण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते.
दरम्यान, आशा भोसले यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरले आहे. काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यावर टीका केली आहे. विशेषत: ठाकरे बंधूंच्या समर्थकांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.