BJP-Shiv Sena: अमित शाहांनी कशी फिरवली चक्र? रवींद्र चव्हाणांनी झटपट ठरवली एकनाथ शिंदेंसोबत बैठक
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज बैठक होणार आहे. पालिका निवडणुकी संदर्भात दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा एका बैठकीची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना (शिंदे गट) मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही बैठक प्रामुख्याने राज्यातील महानगरपालिका निवडणुकांवर केंद्रित असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह इतर काही शहरांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप एकत्र लढण्याच्या शक्यतेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुका हे भाजप-शिवसेना युतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या चर्चा सुरू असल्या तरी ठोस निर्णय घेण्यात उशीर झाला होता. आता या बैठकीत मुंबई महानगरपालिका (BMC), ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांसारख्या प्रमुख शहरांमध्ये एकत्रित लढण्याच्या धोरणावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत काय निर्णय घेतला जाईल, याकडे राजकीय वर्तुळातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत.
अमित शाहा यांच्या भेटीनंतर चर्चांना वेग
काल, 10 डिसेंबरला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली होती. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, युती धोरण आणि स्थानिक निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अमित शाहा यांचे महाराष्ट्रातील राजकारणावर बारकाईने लक्ष असतं. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनानुसारच भाजपचे राज्यस्तरीय निर्णय घेतले जातात. या भेटीनंतर चव्हाण यांनी लगेचच एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असून, आज रात्रीची बैठक निश्चित झाली आहे. भाजप नेत्यांच्या मते, ही बैठक युतीला नव्याने गती देणारी ठरेल आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांनंतर आलेल्या तणावपूर्ण स्थितीला पूर्णविराम देईल.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील युती ही महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. 2022 मध्ये शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सत्ता युती झाली होती, पण स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी मतभेद उद्भवले होते. मुंबई आणि ठाणे येथील महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यास, दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची पारंपरिक ताकद असली तरी भाजपकडूनही सतत प्रयत्न सुरू आहेत. ठाणे शहर हा शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने येथे युतीचा निर्णय सोपा होईल, पण नवी मुंबईत मात्र जागा वाटपावरून चर्चेला जास्त वेळ लागू शकतो.










