EVM मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममधून संशयास्पद आवाज, धाराशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं?
Dharashiv Politics : धाराशिवमधील आधीच रखडलेल्या निवडणूक प्रक्रियेवर या घटनेमुळे आणखी प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, दोन्ही शिवसेना गटांनी आजपासून स्ट्राँग रूम परिसरात “खडा पहारा” देण्याचा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
EVM मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममधून संशयास्पद आवाज
धाराशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं?
गणेश जाधव, धाराशिव : धाराशिव शहरात ठेवलेल्या स्ट्राँग रूममधून ईव्हीएम मशीनचा संशयास्पद आवाज ऐकू आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे शहरातील तीन प्रभागांची निवडणूक रखडलेली आहे. मात्र, आता त्या निवडणुकीसाठी आयोगाकडून स्ट्राँग रूममध्येच मशीनची पडताळणी केली जात असल्याची माहिती मिळाली. मात्र, ही प्रक्रिया उमेदवार किंवा संबंधित पक्षांना कळविल्याशिवाय करण्यात आल्याचा दोन्ही शिवसेना गटांनी गंभीर आक्षेप घेतला आहे.
ईव्हिएमचा आवाज आल्याने दोन्ही शिवसेना आक्रमक
घटनेची माहिती मिळताच दोन्ही शिवसेना गटांचे कार्यकर्ते स्ट्राँग रूम परिसरात दाखल झाले. मशीनमधून अचानक आवाज आल्याने त्यात छेडछाड किंवा अनियमितता सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांचे शिवसैनिक आक्रमक झाले असून प्रशासनाकडून तात्काळ स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली.
शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्हींकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. मशीनची पडताळणी गुपचूप का करण्यात आली? उमेदवारांना का कळविण्यात आले नाही? असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही आतापर्यंतचे संपूर्ण फुटेज उपलब्ध करून देण्याचे दोन्ही गटांनी प्रशासनाला निर्देशित केले आहे.










