'निलेश राणे तर देशभक्तीचं उदाहरण..', सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपची काढली पिसं.. 'तो' Video आता थेट दिल्ली दरबारी
नगर परिषद निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैशाची बॅग पकडून देणाऱ्या शिवसेना आमदार निलेश राणे यांचा उल्लेख थेट लोकसभेत करण्यात आला. सुप्रिया सुळेंनी याच मुद्द्यावर भाजपवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील नगर परिषद निवडणुकांमध्ये एक Video प्रचंड व्हायरल झाला. तो म्हणजे शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी निवडणुकांदरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकून लाखो रुपयांची लाच पकडली होती. ज्याचं त्यांनी सोशल मीडियावर लाइव्ह देखील केलं होतं. ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. यावरून भाजपवर बरीच टीकाही झाली होती. आता हाच मुद्दा देखील लोकसभेत गाजला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (9 डिसेंबर) लोकसभेत बोलताना निलेश राणेंनी पैसे पकडून दिल्याच्या मुद्द्याचा उल्लेख करत भाजपवर जोरदार टीका केली. एवढंच नव्हे तर निलेश राणे हे देशभक्तीचं उदाहरण आहे. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपला चिमटेही काढले.
पाहा सुप्रिया सुळे लोकसभेत नेमकं काय म्हणाल्या...
'महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि त्यांच्या युतीचे 200 हून अधिक आमदार आहेत. चला मानूया की, अगदी खरेपणाने महाराष्ट्रातील निवडणूक झाली. त्यानंतर आता ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं आहे की, पहिले फॉर्ममध्ये गडबड, नंतर अर्ज मागे घेण्यामध्ये गडबड.. त्यानंतर आरक्षणात गडबड..'
'त्यानंतर कॅश मी नाही पकडली.. इथे जे बसले आहेत, त्यांचे मित्र पक्ष असलेला एक आमदार घरात गेला.. कोणाच्या तर भाजप नेत्याच्या.. या नेत्याच्या घरातून त्यांनी लाखो रुपयांची रोकड पकडली. ही गोष्ट सगळ्या न्यूज चॅनलने दाखवली. मी काही याबाबत आरोप करत नाहीए. जे आहे ते सांगतेय.'










