
दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असा विश्वास व्यक्त केला. यानंतर सुप्रिया सुळे या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला. भाजपची सत्ता जेव्हा राज्यात आली तेव्हा पंकजा मुंडे यांचंही नाव मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आलं होतं. असं सगळं असलं तरीही राज्याचं राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्थान बळकट आहे. या सगळ्या प्रश्नी सुप्रिया सुळे यांनी मात्र महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न सुप्रिया सुळेंना चंद्रपुरात विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की मी पदासाठी कोणतंही काम करत नाही. मात्र महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मी पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदार संघातून तिकिट द्यावं अशी मागणी करणार आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
२०२४ ची लोकसभा निवडणूक मी बारामती मतदारसंघातून लढवू इच्छिते. मी पदासाठी कुठलंही काम करत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी मी इच्छुक नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत. त्या खासदार म्हणून दिल्लीत जास्त काळ कार्यरत असतात. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून त्यांनी महाराष्ट्राकडेही थोडं जास्त लक्ष देण्यास सुरूवात केली आहे.
आज चंद्रपुरात त्यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. तसंच त्यांच्या मातोश्री अम्मा यांची भेट घेत त्यांनी चंद्रपूर मतदारसंघात राबवलेल्या वेगवेगळ्या योजनाही माहिती करून घेतल्या. आता यानंतर विविध चर्चा रंगल्या आहेत. अशात त्यांना मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारला असता या पदामध्ये मात्र आपल्याला रस नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
आज किशोर जोरगेवार आणि त्यांच्या आईची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जोरगेवार यांची नाराजी दूर केल्याची चर्चा रंगली आहे. राज्यसभा निवडणुकीत मविआ बॅकफूटवर असल्याची स्थिती असताना जोरगेवार यांच्यासाठी नेमका कोणता निरोप सुप्रिया सुळे घेऊन आल्या होत्या याचीही चर्चा जिल्ह्यात रंगली होती.
सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधताना पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील प्रश्नाबरोबरच थेट त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का या प्रश्नावरही उत्तर दिलं आहे. आपल्याला खासदारकीची निवडणूक लढवायची आहे. बारमतीमधूनच ही निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे असं त्यांनी म्हटलं आहे.