Sanjay Raut : महाराष्ट्रातली ११ कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा

महाराष्ट्र द्वेष्ट्यांकडून शिवसेना संपवण्याचा कट आखला गेलाय हा आरोप संजय राऊत यांनी केला आहे
The 11 crore people of Maharashtra are proof that Shiv Sena is ours says sanjay raut
The 11 crore people of Maharashtra are proof that Shiv Sena is ours says sanjay raut

महाराष्ट्रातली ११ कोटी जनता हाच शिवसेना आमचीच असल्याचा पुरावा आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेना नेमकी कुणाची खरी आहे हे ८ ऑगस्ट पर्यंत सिद्ध करा असे निर्देश भारतीय निवडणूक आय़ोगाने दिले आहेत. त्यासाठी पुरावे सादर करा हे देखील निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी हे उत्तर दिलंय.

नेमकं काय म्हटलेत संजय राऊत शिवसेनेबाबत?

महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ती एक अस्वस्थ करणारी घटना आहे. मराठी माणसांच्या हृदयाला घरं पाडणारा असा हा प्रसंग आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ५६ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना केली. हिंदुत्वाचा विचार घेऊन ही संघटना पुढे गेली. या संघटनेवर फुटिरांनी खरी शिवसेना कुणाची हे सादर करण्याची वेळ आणावी यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. जे फुटले आहेत त्यांनी वेगळा गट स्थापन केलाय. दिल्लीश्वरांना जे हवं आहे त्यांचं हत्यार म्हणून हे वापरले जात आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

शिवसेना संपवण्याचा डाव आखणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही

उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. मराठी माणसाच्या मनात शिवसेनेचं असं एक स्थान आहे. आज आमच्यावर तुम्ही पुरावे सादर करायची वेळ आणत आहात हे पाप तुम्हाला फेडावं लागेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आज तुम्ही घोड्यावर बसलेला आहात, मात्र जनता तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातले आहेत, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करायची वेळ आणली आहे त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. राज्याची जनता त्यांना माफ करणार नाही. नियतीही माफ करणार नाही. महाराष्ट्राची ११ कोटी हाच आमचा पुरावा आहे. सीमा प्रश्नासाठी मेलेले ६९ हुतात्मे हा पुरावा आहे. हजारो आंदोलनातून आमचे शिवसैनिक तुरुंगात गेला, शहीद झाले हा पुरावा आहे. महाराष्ट्राच्या माती-मातीच्या कणात, मराठी माणसाच्या रक्तात शिवसेना आहे हा पुरावा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ही शिवसेना पुढे चालली आहे हे संजय राऊत म्हटलेत. शिवसेनेतले लोकसभेतले गटनेते विनायक राऊत यांनी ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं त्यांना उत्तर दिलं नाही. मात्र आमच्यातला फुटीर गट गेला त्यांना चोवीस तासात मान्यता देण्यात आली. तुम्ही कोणते पुरावे सादर करणार अशा प्रकारे सत्याचा खून होत असेल तर? महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या आदेशाने जी वेळ या लोकांनी आणली आहे त्यांना जनता माफ करणार नाही हे संजय राऊत यांनी म्हटलंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in