हर हर महादेवचा वाद आणि आव्हाडांच्या थिएटरमधल्या राड्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

वाचा सविस्तर बातमी काय घडली घटना आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?
What did Devendra Fadnavis say about the controversy of Har Har Mahadev and the row in the theater of Awhad?
What did Devendra Fadnavis say about the controversy of Har Har Mahadev and the row in the theater of Awhad?

हर हर महादेव या सिनेमाचा ठाण्यातल्या व्हिव्हिआना मॉलमधला शो राष्ट्रवादी काँग्रेसने बंद पाडला. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन करण्यात आलं. त्यावरून चांगलीच चर्चा होते आहे. अशात आता या सगळ्या राड्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हटलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी?

कुणालाही विरोध दर्शवायचा असेल तर लोकशाहीच्या मार्गाने करावा. त्यासाठी त्यांना कुठल्याही संमतीची गरज नाही. मी हर हर महादेव हा सिनेमा पाहिलेला नाही. मात्र यावरून कुणालाही काहीही आक्षेप असतील तर ते सनदशीर पद्धतीने त्यांनी मांडावेत. थिएटरमध्ये जाऊन शो बंद करणं प्रेक्षकांना मारहाण करणं चुकीचं आहे हे ज्यांनी केलं असेल त्यांच्यावर कारवाई होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकी काय घडली घटना?

ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधील चित्रपटगृहात 'हर हर महादेव' या चित्रपटावरुन राष्ट्रवादी विरुद्ध मनसे आमने-सामने आलेले पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन सोमवारी रात्री दहा वाजताचा शो बंद पाडला. तर त्याचवेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरु करण्याचा आग्रह धरला. या दरम्यान, चित्रपटगृहात जोरदार राडा झाला. या राड्यात प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन एका प्रेक्षकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याची माहिती आहे.

राड्यानंतर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

राड्यानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम आणि विकृत करण्याची जी पुरंदरेंची परंपरा आहे, ती आता चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ही पद्धत महाराष्ट्रात आणली आहे. पण असे विकृत चित्रपट महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा इशाराही आव्हाड यांनी दिला.

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले होते?

खासदार संभाजीराजे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वेडात मराठे वीर दौडले सात आणि हर हर महादेव या चित्रपटांवरून संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यामुळे त्यावर कुणी सिनेमा करणार असेल तर ती कौतुकाचीच बाब म्हटली पाहिजे. राजस्थानचे महाराणा प्रताप घराणं सोडलं तर अनेक ऐतिहासिक सिनेमा आले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in