ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली. परंतू सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघातील खेळाडूंना वर्णद्वेषी टीका सहन करावी लागली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याप्रकरणी चौकशी करत आपला अहवाल सादर केला आहे. ज्यात भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका झाल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मान्य केलंय.
सिडनी टेस्ट मॅचमध्ये मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी टीका करणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी मैदानावर येत बाहेर काढलं होतं. भारतीय खेळाडूंविरोधात वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख अधिकारी सिन कॅरोल यांनी सांगितलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रकरणाचा तपास सुरुच ठेवणार आहे.
सीसीटीव्ही फुटेज, तिकीट विक्रीतून जमा झालेली माहिती, सामना पहायला आलेल्या इतर लोकांकडून वर्णद्वेषी टीका करणारी लोकं कोण होती याचा तपास क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे. त्यामुळे याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आता काय कारवाई करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.