IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये प्रवेशासाठी मुंबईची आशा धुसर, रंगतदार सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय

मुंबईच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत झुंज, मोक्याच्या क्षणी दिल्लीचा विजय
IPL 2021 : प्ले-ऑफमध्ये प्रवेशासाठी मुंबईची आशा धुसर, रंगतदार सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय
श्रेयस अय्यरची दिल्लीच्या विजयात मोलाची भूमिकाफोटो सौजन्य - Delhi Capitals

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. शारजाहच्या मैदानावर झालेल्या लो स्कोअरिंग गेममध्ये दिल्लीने मुंबईवर ४ विकेट राखून मात केली. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीत प्रवेशाच्या आशा धुसर झाल्या आहेत.

शारजाहच्या मैदानावर पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या मुंबईची सुरुवातच खराब झाली. कॅप्टन रोहित शर्मा आवेश खानच्या बॉलिंगवर ७ रन काढून आऊट झाला. यानंतर क्विंटन डी-कॉक आणि सूर्यकुमार यादवने मुंबईची बाजू सांभाळली. दोघेही मैदानावर सेट होतायत असं वाटत असतानाच डी-कॉक अक्षर पटेलच्या बॉलिंगवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. यानंतर गेल्या काही सामन्यांपासून खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या सूर्यकुमारने सौरभ तिवारीच्या साथीने संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला.

परंतू मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करण्यात मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले अक्षर पटेलने सूर्यकुमार यादवला आऊट करत मुंबईला तिसरा धक्का दिला, त्याने ३३ रन्स केल्या. यानंतर मुंबईचे फलंदाज भागीदारी करु शकले नाही. एकामागोमाग एक विकेट पडत राहिल्यामुळे मुंबईचा संघ मोठी धावसंख्या उभारुच शकला नाही. अखेरच्या फळीतल्या जयंत यादव आणि कृणाल पांड्याने फटकेबाजी करत संघाला १२९ पर्यंतचा पल्ला गाठून दिला. दिल्लीकडून आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी सुरेख मारा करत प्रत्येकी ३-३ तर आश्विन आणि नॉऱ्टजेने १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल दिल्लीची सुरुवातही खराब झाली. शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव्ह स्मिथ, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हे बिनीचे शिलेदार एकामागोमाग एक आऊट होत राहिल्यामुळे एका क्षणाला दिल्लीचा संघ ५ बाद ७७ अशा खडतर परिस्थितीत सापडला होता. मधल्या फळीत दिल्लीचा माजी कॅप्टन श्रेयस अय्यर आणि हेटमायरने भागीदारी करुन दिल्लीला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतू बुमराहने हेटमायरची विकेट घेत दिल्लीच्या अडचणींमध्ये आणखी भर घातली.

परंतू यानंतर मैदानावर आलेल्या आश्विनने श्रेयसची उत्तम साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी फारशी जोखीन न घेता गरजेच्या वेळी फटकेबाजी आणि त्याव्यतिरीक्त एकेरी-दुहेरी धावांचा ओघ सुरु ठेवला. मुंबईच्या बॉलर्सनी ही जोडी फोडण्याचे प्रयत्न केले खरे...पण त्यांना यश आलं नाही. मुंबईविरुद्ध सामना खेळायच्या आधीच दिल्लीने प्ले-ऑफचं तिकीट मिळवलं होतं. तर मुंबईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजयासह अन्य संघांच्या विजय/पराभवावर अवलंबून रहावं लागणार आहे.

Related Stories

No stories found.